
अंधेरी-कुर्ला मार्गावरील सफेद पुलाजवळील अरुंद रस्ता आणि वाहनांच्या प्रचंड रहदारीमुळे पादचाऱयांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. या मार्गावर पदपथ तयार करण्याबाबत मागणी करून वर्ष उलटल्यानंतरही पालिका प्रशासन ढिम्म राहिले आहे. प्रशासनाच्या सुस्त
कारभारावर संताप व्यक्त करीत स्थानिक रहिवाशांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन दिले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये सफेद पुलाजवळ नवीन पूल उभारणीचे काम हाती घेतले. सध्या दुसऱया टप्प्याचे काम सुरू आहे. हे काम करताना पदपथ उपलब्ध न केल्यामुळे रहिवासी आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत आहे. संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी या परिसरात तातडीने योग्य फलकांसह पदपथ उपलब्ध करावा, अशी मागणी रहिवाशांतर्फे ऍड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लेखी निवेदन दिले आहे. अंधेरी-कुर्ला मार्गावरील वाहतूक कोंडी आणि प्रचंड रहदारी लक्षात घेत हा विषय गांभीर्याने विचारात घेऊन तात्काळ सोडवण्यात यावा. तसेच पदपथ सुरू केल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा सूचना फलक ठळकपणे लावावेत, असे दहिबावकर यांनी म्हटले आहे.
कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
सफेद पूल परिसरात मागील वर्षभर पदपथ सुरू करण्यास दिरंगाई करणाऱया आणि रहिवाशांचा जीव धोक्यात घालणाऱया कार्यकारी अभियंता पूल विभागातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. पदपथाची मागणी करून रहिवाशांनी त्यासाठी 10 महिने वाट पाहावी लागते ही महापालिकेसाठी लाजिरवाणी बाब आहे. पालिका अपघाताचीच वाट पाहतेय का, असा संतप्त सवाल रहिवाशांनी केला आहे.


























































