
राजेश देशमाने । बुलढाणा
‘पथ का अंतिम लक्ष नही है,
सिंहासन चढते जाना,
सब समाज सब लोगो को लिए साथमे आगे ही बढते जाना’
या अटलबिहारी वाजपेयी यांनी लिहिलेल्या काव्यपंक्तीप्रमाणे त्यांनी समाजातल्या सर्व घटकाना सोबत घेऊन जनसंघ, जनता पार्टी ते भाजप अशी वाटचाल केली. या वाटचाली दरम्यान बुलढाणा जिल्ह्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आले. या संबंधातूनच त्यांनी पक्षवाढी बरोबर कार्यकर्ते घडवले. बुलढाणा जिल्ह्याशी त्यांचे जवळचे संबंध होते.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सहवासात राहिलेले चिखलीचे माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब लाहोटी आठवणी सांगताना म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी चिखली शहरात जनसंघाच्या प्रचारासाठी 1952 ला चिखली शहरात प्रथम आले होते. प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर आले. पायजामा, नेहरु शर्ट, शबनम बॅग हा त्यांचा पोषाख होता. त्यांनी शबनम बँगेतून हाफपॅन्ट काढून ती परिधान करुन ध्वजाला प्रणाम केल्यानंतर चिखलीतील उपस्थित स्वयसेवकाला मी लखनऊचा स्वयंसेवक असल्याचे सांगून सर्वांना परिचय करुन दिला. त्यानंतर ते जनसंघाच्या प्रचारासाठी आल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री रेणुकामाता मंदिराजवळ चौकात दिडशे लोकांची प्रचारसभा बत्त्या लावून घेतली. त्यानंतर 1965 ला ते दुसर्यांदा चिखली शहरात आले. आणीबाणी नंतर 1980 ला ते चिखली शहरात तिसर्यांदा आले. यावेळी चिखलीच्या म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानात रात्री दीड वाजता त्यांची विराट जाहीर सभा झाली. त्याप्रमाणे केशवराव बाहेकर यांच्या प्रचारासाठी सुद्धा ते चिखली शहरात येऊन गेल्याची माहिती भाऊसाहेब लाहोटी यांनी देऊन वाजपेयी यांनी गोविंदराव बाबा शेटे, रामविलासजी डागा यांच्या घरी मुक्काम सुद्धा केला. आणीबाणीच्या काळात भाऊसाहेब लाहोटी व चिखलीच्या स्वयंसेवकांशी पत्रव्यवहार करुन बळ देण्याचे काम त्यांनी केले.

अमडापूरला दोन दिवस मुक्काम, बुलढाण्यातील गांधीभवन येथे जाहीर सभा, नाट्य क्रीडा मंदिरमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा, भाजपाच्या जिल्हा मेळाव्यात उपस्थिती अशा काही स्मृती त्यांच्या बुलढाण्याशी निगडीत आहे. भाजपच्या स्थापनेपूर्वी जनसंघाचे जाळे देशभर विणण्यासाठी अटलजी परिश्रम घेत होते. १९६७ च्या निवडणुकांमध्ये जनसंघाकडून मेहकर विधानसभा मतदारससंघासाठी उमेदवार म्हणून बाजीराव डाळीमकर यांना उतरविण्यात आले होते. त्यांच्या प्रचारार्थ अटलजी बुलढाण्यात आले होते. अमडापूर-कव्हळा येथे जाण्यासाठी वाहतुकीचे दुसरे साधन उपलब्ध झाले नाही. पण काहीही झाले तरी जायचेच, हा अटलजींचा निर्धार होता. पक्षासाठी कष्ट आणि समर्पणाचे आदर्श उदाहरण यापेक्षा दुसरे काय असेल की, अटलजींनी बैलगाडीने जाण्यातही त्यांनी डाळीमकरांचे अमडापूर येथील निवासस्थान गाठले होते. तब्बल दोन दिवस मुक्काम करुन डाळीमकरांचे त्यांनी निवडणूक नियोजन केले होते. यादरम्यान सभाही घेतल्या होत्या. मोहन भागवत ज्यांना ‘भिष्माचार्य’ म्हणून संबोधायचे असे अमडापूर येथील नागोराव अंबादास गवळी हे संघाच्या प्रशिक्षणवर्गात दोन वेळा सोबत होते. यादरम्यान नागपूरमध्ये अटलजींचा महिने-महिने मिळालेला सहवास आयुष्यातील अमूल्य ठेवा असल्याच्या भावना नागोराव गवळी यांनी सामनाशी बोलताना सांगितल्या. अटलजींच्या आठवणींना उजाळा देताना माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा यांनी 1980 चा प्रसंग सांगितला. भाजपचे विधानसभा उमेदवार केशवराव बाहेकर यांच्या प्रचारासाठी अटलजींची टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या प्रांगणात जाहीर सभा झाली होती. दळणवळणाची पुरेशी साधने नसल्यामुळे रात्री 9 वाजेच्या सभेला अटलजी मध्यरात्रीनंतर 1 वाजता पोहोचले. त्यावेळी नगराध्यक्ष आणि भाजप शहर सचिवपदावर कार्यरत गोकुल शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले होते. सभा उशिरा झाल्यामुळे गर्दी कमी झाली होती पण अटलजींनी त्यावेळी केलेले ओजस्वी भाषण आजही अंगावर रोमांच उभे करते, या भावना शर्मा यांनी मांडल्या. 1996 मध्ये भाजपच्या बुलढाणा जिल्हा मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची उपस्थिती येथील भाजपला उर्जा देणारी ठरली होती.

भाजपच्या अखिल भारतीय अधिवेशनाच्या एका किस्स्यातून गोकुल शर्मा यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या विद्वत्तेचा परिचय दिला. 1986 मध्ये मुंबईतील या अधिवेशनात शर्मा उपस्थित होते. त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. व्ही. डी. पाटीलही होते. पक्षाचे तत्कालीन संघटन मंत्री वसंतराव भागवत यांनी अटलजींसोबत भेट घालून देतो, असे सांगून दोघांची भेट घालून दिली. त्यावेळी शर्मा हे बुलढाणा नगर परिषदेत नगरसेवक होते. नगरसेवक म्हणून परिचय दिल्यानंतर शर्मा यांना अटलजींनी विचारले होते. नगर परिषदों के अधिकार बढने चाहीए न?, त्यावर शर्मा यांनी निश्चितच असे उत्तर दिले होते. अटलजींचा सुक्ष्म अभ्यास, विकासात्मक दृष्टीकोन आणि दुरदृष्टी पाहून प्रभावित झालो होतो. त्यांची उणिव कदापि भरुन निघणार नाही, या शब्दात शर्मा यांनी भावनांचा गहिवर व्यक्त केला.
वाजपेयींची 1966 ची सभा आजही मेहकरच्या स्मरणात
मेहकरचे सामना वार्ताहर प्रदीप जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 15 डिसेंबर १९६६ ला घेतलेली मेहकर मधील भव्य सभा आजही मेहकर वासियांच्या स्मरणात असून अटलजींच्या निधनानंतर या स्मृतींना उजाळा मिळाला आहे.

संघाच्या स्थापनेनंतर मेहकर हा संघाच्या दृष्टीकोनात जिल्हा होता. संघाची मंडळी मेहकरलाच जिल्हा मानत होती. 1966 चा काळ निवडणुकीचा होता. त्या निमित्त 15 डिसेंबर 1966 ला मेहकर मधील सध्याही अस्तित्वात असलेले इंग्रज काळातील घुमट (इंग्रज या वास्तूत घोड्याला विश्रांतीसाठी ठेवत) या परिसरात वाजपेयींची विराट सभा झाली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन मेहकर संघ प्रमुख गुलाबचंद लोहीया होते. या सभेचा मेहकरवर एवढा परिणाम झाला की, 1967 च्या निवडणुकीत गुलाबचंद लोहीया हे मेहकरचे नगराध्यक्ष झाले होते. गुलाबचंद लोहीया यांचा मुलगा चंदुसेठ लोहीया, नातू राजेश लोहीया, डॉ. संजय लोहीया यांनी सुद्धा गुलाबचंद यांचे संघाचे व भाजपचे कार्य पुढे सुरु ठेवले ते आजतागायत सुरु आहे. वाजपेयी यांच्या मेहकर मधील सभे दरम्यान मेहकर मधील जिल्हा संघचालक भाऊसाहेब शेंदुर्जनकर, बाबुराव पुराणिक, श्रीकृष्ण पुराणिक, सुमती सुकळीकर, पंडीत अवस्थी, वि. घ. देशपांडे, दादासाहेब सोमण, आर.टी. सावजी, बाबा सराफ, लक्ष्मणकाका पिंपरकर, नागनाथ जोशी, मांगीलाल शर्मा, दादम भटजी, श्रीधर निमदेव, आश्रुजी गाडेकर, सहकारमहर्षी अण्णासाहेब देशमुख ही मंडळी गुलाबचंद लोहीया सोबत संघ कामात आघाडीवर होती.
या सभेतील आठवणी
अटलजींच्या मेहकरच्या सभेत त्यांनी तत्कालीन सत्ताधारी यांच्यावर हल्ला चढविताना साधू व उंदिर यांची गोष्ट सांगून उंदराला साधून वाघ बनविल्यानंतर तो साधूलाच खायला निघाला अशा आशयाची ‘पुनर्रमूषक भव:’ ही गोष्ट सांगून तत्कालीन सत्ताधार्यांची वाभाडे काढून टाळ्या घेतल्या होत्या अशी आठवण सेवानिवृत्त प्राचार्य पी.आर. जोशी यांनी सांगितली. तर याच सभेत अटलजींचे स्वागत सुरु असताना काही हार हे वारंवार फिरवले जात असल्याचे लक्षात येताच अटलजींनी हार टाकणार्यांचा हार गळ्यातून काढलाच नाही व स्वागताची गर्दी कमी झाल्याने सभा लवकर सुरु झाली. ही आठवण लोहीया परिवाराने सांगितली. ज्येष्ठ पत्रकार मुकूंद जोशी यांनी सांगितले की 1967 ला चिखली मतदार संघातून बाजीराव डाळीमकर हे जनसंघावर रिंगणात उतरले होते. वाजपेयी हे त्यांच्या प्रचारासाठी बैलगाडी, मोटारसायकल वर फिरले. तसेच त्यांचा मुक्काम डाळीमकरांच्याच घरी होता. पुढे डाळीमकरांच्या मुलांनी घरांची दुरुस्ती व रंगरंगोटी करताना ज्या खोलीत अटलजींचा मुक्काम होता त्या खोलीचे रंगकाम बाजीरावांनी करु दिले नाही. एवढी निष्ठा या परिवाराची अटलजींवर होती.


























































