वाजपेयींची प्रकृती चिंताजनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपचे ‘पुराणपुरुष’ आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे वृत्त आहे. स्वातंत्र्य दिन आज साजरा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयी यांच्या भेटीसाठी तातडीने ‘एम्स’ रुग्णालयाकडे धाव घेतली. मोदी यांच्याआधी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यासुद्धा वाजपेयी यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचल्या होत्या.

वाजपेयी यांना युरिन इन्फेक्शनमुळे 11 जूनला ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते 2009 सालापासून म्हणजे गेली नऊ वर्षे आजारीच आहेत. पक्षाघातामुळे वाजपेयींना कोणाशीही बोलता येत नसून स्मृतिभ्रंशामुळे त्यांना लोकांना ओळखणेही कठीण झालेले आहे.

वाजपेयींची प्रकृती शनिवार 11 ऑगस्टपासून खूपच खालावली आहे. शनिवारी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. वाजपेयींच्या प्रकृतीत चढउतार सुरूच आहेत. आज सायंकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याचे समजताच पंतप्रधान मोदी यांनी तातडीने एम्स रुग्णालयात धाव घेतली. वाजपेयी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे बुलेटिन रुग्णालयाने रात्री जारी केले.