
शिवसेनेबरोबर ज्याची युती होती तो मूळ भारतीय जनता पक्ष मेलाय, लालकृष्ण आडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयींच्या भाजपची सत्तापिपासूंनी हत्या केलीय, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. मराठी माणसाच्या एकीकरणाची, विजयोत्सवाची खिल्ली उडवणाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या सोहळय़ाचा ‘रुदाली’ असा उल्लेख केला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मराठी माणसाचा आनंदक्षण ज्यांना रुदाली वाटत असेल ती अत्यंत विकृत आणि हिणकस प्रवृत्तीची माणसे आहेत, असे ते म्हणाले.
भाजपवाले हिंदूंनाही वाचवू शकत नाहीत ते आता मराठीवर अन्याय करणाऱ्यांची बाजू घेत आहेत. लाज वाटली पाहिजे. हे असे कर्मदरिद्री लोक दुर्दैवाने महाराष्ट्रात राज्यकर्ते आहेत याची लाज वाटते.
उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवनात शिवसेना आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मराठीसाठी केलेले आंदोलन आणि विजयोत्सवाला सहकार्य केल्याबद्दल राज्यातील सर्व माध्यमांचे आभार मानतानाच, या विजयोत्सवावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा उद्धव ठाकरे यांनी या वेळी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
वाजपेयी, आडवाणी यांची मूळ भाजपा फडणवीसांसारख्यांनी मारून टाकली. त्याचे दुःख व्यक्त करायला आताच्या भाजपने इतर पक्षांमधून उरबडवे घेतले आहेत. कारण ऊर बडवायलाही भाजपकडे ओरिजिनल माणसे नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना-मनसे एकत्र आल्याने गिरीश महाजन यांच्यासारख्या लोकांच्या बुडाला आग लागली आहे, ती आग दाखवताही येत नाही आणि शमवताही येत नाही, करणार काय? असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला.
कोणत्याही भाषेचा आम्ही विरोध करत नाही, केवळ सक्तीचा विरोध करतोय, त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात राबवत असाल तर उत्तर हिंदुस्थानातील राज्यांमध्ये तिसरी भाषा कोणती लागू करणार हेसुद्धा सांगा, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
आम्ही एकत्र आल्याने भाजपच्या बुडाला आग लागलीय
महाराष्ट्रात एकही उद्योग नाही, सगळं आमच्याकडे, आमच्या पैशांवर जगता अन् दादागिरी करता, अशी भाषा भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली होती. त्यावर मुंबईत मराठी माणसासोबत इतर भाषिक गुण्या-गोविंदाने राहत आहेत. त्यामुळे भाजपच्या बुडाला आग लागली आहे आणि दुबेसारखे लांडगे ती आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी सणसणीत चपराक उद्धव ठाकरे यांनी लगावली.
पहलगामचे अतिरेकी भाजपात गेले काय?
पहलगामच्या दहशतवाद्यांप्रमाणेच मुंबईत भाषा विचारून अमराठींना मारहाण केली जातेय असे म्हणणाऱ्या आशिष शेलार यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला. मराठी माणसांची तुलना पहलगामच्या अतिरेक्यांशी करणारेच खरे मराठीचे मारेकरी आहेत, या मारेकऱ्यांना आता मराठी माणसाने ओळखले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पहलगामचे अतिरेकी गेले कुठे… ज्यांनी आरोप केला त्यांच्या घरात राहत आहेत का भाजपमध्ये गेले, असा खोचक सवालही त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना तिथल्या तिथे ठोका
छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारे मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल कुणी अवमानास्पद बोलेल तर तो कुणीही असो त्याला तिथल्या तिथे ठोकले पाहिजे, असा एका वाक्यात समाचार घेतला.