
>>नवनाथ शिंदे
एटीएम मशीनमधून पैसे काढताना काळजी घेतली नाही तर मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे. एटीएम मशीनमध्ये स्कीमर (गुप्त कॅमेरा) लावून पासवर्ड चोरून लाखो रूपयांना गंडा घालणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. टोळीने शहरासह इतर ठिकाणच्या एटीएम मशीनमध्ये स्कीमर लावून नागरिकांच्या लाखो रूपयांवर डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
शहरासह उपगनरांमध्ये विविध बँकाची एटीएम केंद्र आहेत. मात्र, एटीएम मशीनजवळ सुरक्षारक्षक नसणे, कमी वर्दळीच्या परिसरात केंद्र असणे याचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांकडून नागरिकांना गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे. एटीएममधून पैसे काढताना नागरिकांकडून खबरदारी न घेतल्यामुळे अनेकांना फटका बसला आहे. कमी वर्दळीच्या ठिकाणांसह सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम सेंटरमध्ये सायबर चोरट्यांचे लक्ष असते.
टोळीकडून एटीएम मशीनमध्ये आतील बाजूस स्कीमर गुप्त कॅमेरा बसवून नागरिकांच्या एटीएमचे गुप्त पासवर्ड चोरले जातात. त्यानंतर बनावट एटीएम कार्डद्वारे इतर शहरातून रक्कम काढली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी एटीएम मशीनमधून रक्कम काढताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या ठिकाणांसह अनोळखी ठिकाणी असलेल्या एटीएम मशीनमधून रक्कम काढताना नागरिकांनी मशीनची छेडछाड झाली नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे. त्याशिवाय रक्कम काढताना अनोळखी नागरिकांच्या ताब्यात एटीएम कार्ड देऊ नये. अन्यथा संबंधित चोरट्यांकडून पासवर्ड विचारून हातचलाखीने त्यांच्याकडील बनावट एटीएम कार्ड देऊन फसवणूक होण्याची शक्यता आहे.
फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
- एटीएम कार्डसंदर्भात फोनवर माहिती विचारणाऱ्यांना प्रतिसाद देऊ नका.
- पीनक्रमांक टाकताना स्कीमर नसल्याची खात्री करा.
- बक्षीस, आमिषाला बळी पडून एटीएमचा पासवर्ड सांगू नका.
- कोणत्याही बँकेकडून एटीएम पासवर्डची माहिती विचारली जात नाही.
- एटीएम आणि बँकिंगसंदर्भात विचारणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्या.
- एटीएममधून पैसे काढताना अनोळखी व्यक्तींकडून मदत घेऊ नये.
- अत्यावश्यक असतानाच एटीएम कार्डचा वापर करा.
- एटीएम कार्डवर पासवर्ड लिहू नका.
- बँकेजवळ असलेल्या एटीएममधून पैसे काढण्यास प्राधान्य द्या.
- एटीएममध्ये सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक असल्याची खात्री करा.
- मशीनमध्ये गुप्त कॅमेऱ्याबाबत संशय आल्यास पोलिसांना कळवा.
- प्रत्येक सहा महिन्याला एटीएम कार्डचा पासवर्ड बदला.
कोणत्याही एटीएम सेंटरमध्ये रक्कम काढताना नागरिकांनी मशीनमध्ये स्कीमर डिव्हाईस नसल्याची खात्री करणे गरजेचे आहे. त्याशिवाय पीनकोड टाकताना कोणालाही दिसणार नाही, याची खबरदारी घ्यावी. एटीएमकार्ड संदर्भात गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका. त्यामुळे फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे.
-राजकुमार वाघचवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर विभाग पुणे




























































