परभणीत एटीएममध्ये खडखडाट, कॅशच्या तुटवड्यामुळे ग्राहकांची भटकंती

परभणी शहरासह जिल्हाभरात गेल्या तीन दिवसांपासून बँक व्यवहार बंद असल्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परभणी शहरात अर्ध्यापेक्षा अधिक एटीएम रिकामेच आहेत. कॅशच्या तुटवड्यामुळे अनेक ग्राहकांना भटकंतीची वेळ आली आहे. अनेक एटीएम मध्ये नो कॅशचे फलक लागले आहेत. त्यास भरीस भर म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम गेल्या महिनाभरपासून बंदच आहे. याचा मोठा फटका बँकेच्या ग्राहकांना बसत असून एटीएम घेऊन खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना आल्या पावलीच परत जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.

एटीएम मध्ये कॅशचा तुटवडा निर्माण झाल्याने पुढील दोन दिवस काय होईल असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे. शहरात विविध बँकांचे 30 ते 35 एटीएम आहेत. त्यातील चार एटीएमध्ये आगीत भस्मसात झाले आहेत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेची 28 फेब्रुवारीपर्यंत एटीएम सेवा बंद आहे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुटीचे असल्याने परभणी शहरातील व जल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत आले होते. तेव्हा एटीएम मध्ये खडखडाट निर्माण झाल्याची परिस्थिती पाहून ग्राहकांची चांगलीच अडचण झाली आहे. जेव्हापासून एटीएमची सुविधा उपलब्ध झाली आहे, तेव्हापासून बहुतांश ग्राहक स्वत:जवळ नगदी रक्कम न बाळगता एटीएम कार्ड घेऊन आपले व्यवहार भागवत असत. जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठेतील एटीएम मध्ये शनिवार आणि रविवारी नो कॅशची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मोजक्याच एटीएम मध्ये कॅश असल्याने या एटीएम बाहेर पैसे काढण्यासाठी ग्राहकांची रांगच रांग लागलेली दिसून आली. सायंकाळी हे एटीएम सुद्धा रिकामे झाले. परिणामी काही ग्राहकांना शहराबाहेरील एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याची वेळ आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या