
काही दिवसांपूर्वी पोस्ट विभागात एका पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याने खळबळ उडाली होती. ते पार्सल जयपूरवरून विक्रोळीला पाठवण्यात आले होते. त्या प्रकरणाची गंभीर दखल घेत दहशतवाद विरोधी पथकाने पोस्ट विभागाला संशयास्पद पार्सल्सची व्यवस्थित तपासणी करण्यास सांगितले आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने महाराष्ट्राचे पोस्ट विभागाच्या प्रमुखांना पत्र लिहून सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. ‘चुकीचं नाव, पत्ता, नंबर किंवा संशयास्पद वाटणाऱ्या पार्सलची पोस्ट विभागाने नीट तपासणी करावी. तसेच कधी काही संशयास्पद जाणवले तर त्याबाबत एटीएस किंवा एनसीबीला कळवावे असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सप्टेंबर महिन्यात विक्रोळी पोस्ट विभागात एक पार्सल आले होते. त्या पार्सलवरील पत्ता व नंबर चुकीचा होता. त्यामुळे ते पार्सल पुन्हा पोस्ट विभागात आले. बरेच दिवस कुणीही त्याबाबत चौकशी न केल्याने पोस्ट विभागाने ते पार्सल उघडले असता त्यात दोन बॉक्समध्ये ड़्रग्जची पाकिटं आढळून आली होती.
”पोस्ट विभागाने आता पोस्टासाठी ओटीपी प्रणाली सुरू करायला हवी. तसेच चुकीचा पत्ता किंवा चुकीचे नाव असलेल्या पार्सलची डिलिव्हरी करताना ओळखपत्र तपासून मगच ते पार्सल द्यावे. ओळखपत्राचे योग्यप्रकारे सर्वेक्षण करून मगच ते पार्सल संबंधित व्यक्तीला द्यावे’, असे एटीएसकडून सांगण्यात आले आहे.
































































