राष्ट्रीय रोईंगपटूवर प्राणघातक हल्ला; 2 अल्पवयीन ताब्यात

सामना ऑनलाईन । नाशिक

राष्ट्रीय रोईंगपटू निखील सोनवणे याच्यावर मंगळवारी रात्री लुटारूंच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला. हातावर आणि पाठीवर कोयत्याने वार केल्याने तो जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, खेळाडूही सुरक्षित न राहिल्याने चिंता व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय रोईंगपटू निखील सोनवणे हा मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास जुना गंगापूर नाका येथून सराव करून सायकलने घरी जात होता. चोपडा लॉन्सजवळील पेट्रोलपंपासमोर तिघांनी त्याला अडविले. तंबाखू मागण्याचे निमित्त करून लूटमार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याजवळ पैसे नसल्याने लुटारू चिडले, त्याच्या पाठीवर आणि हातावर कोयत्याने वार करून ते फरार झाले. यानंतर रस्त्याने जाणाऱ्यांच्या मदतीने निखीलला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाठीवर बॅग असल्यामुळे कोयत्याचे खोलवर वार झाले नाही. मात्र, हाताला गंभीर दुखापत झाल्याने आठ टाके पडल्याचे पंचवटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. डी. पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी मोरे मळा भागातील तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यातील दोघे सतरा वर्षांचे अल्पवयीन आहेत. तिसरा सज्ञान संशयित दीपक सुखदेव डगळे (21) याच्यासह तिघांना बुधवारी सकाळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासमोर उभे करून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक डगळे याला अटक करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेची संधी हुकली

निखील सोनवणे हा राष्ट्रीय रोईंगपटू आहे. त्याने या खेळात सुवर्णपदक पटकाविले आहे. 17 ते 19 मे दरम्यान पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याचा सराव सुरू होता. हाताला व पाठीला गंभीर दुखापत झाल्याने आता त्याला या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. या स्पर्धेत मी मोठे यश मिळविणार होतो, त्यानंतर खेळणार नव्हतो, असे ठरविले होते; परंतु आता या स्पर्धेची संधी हुकणार आहे. आणखी तयारी करून पुढील स्पर्धेत जोमाने उतरेल, असा आत्मविश्वास निखीलने व्यक्त केला.