नऊ लाख इन्स्टाग्राम फॉलोअर असणाऱ्या रिलस्टारवर हल्ला, बीट मार्शलमुळे वाचले प्राण

नऊ लाख फॉलोअर असणाऱ्या रिलस्टारचा इन्स्टाग्राम आयडी मिळवण्यासाठी तिघांनी शुक्रवारी हल्ल्याचा प्रयत्न केला. गस्तीवरील बीट मार्शल्सने क्षणाचाही विलंब न करता तिघांनाही पकडले. यातील अटक केलेल्या एकाला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथील सौरभ सुनील मौर्या (19) याचे इन्स्टाग्रामवर तब्बल नऊ लाख फॉलोअर आहेत. त्याचा इन्स्टाग्राम आयडी मिळवण्यासाठी अल्पवयीनांसह तिघांनी सौरभ व मित्र नानावली येथील साहील शेख याच्याशी कन्नमवार पुलाखाली वाद घातला. तो आयडी देण्यास तयार नसल्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. हा आरडाओरडा ऐकून गस्तीवरील भद्रकाली पोलीस ठाण्याचे त्रिकोणी गार्डन येथील बीट मार्शल संतोष आव्हाड व अझरुद्दीन इनामदार हे घटनास्थळी धावून आले.

सौरभ याच्या मानेवर चॉपरने वार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला त्यांनी रोखले, त्याच्यासह इतर दोन साथीदारांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी फरीद मन्सूरी (19) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे दोन साथीदार अल्पवयीन असून त्यांची रवानगी निरीक्षण गृहात करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यवान पवार, दीपक तोंडे, संदीप शेळके, नरेंद्र जाधव आदींनी पार पाडली.