
सामना प्रतिनिधी । नांदेड
हदगाव येथे शिवसेना आमदार नागेश पाटील यांनी स्थापन केलेल्या दुर्गा मंडळाच्या शतचंढी यज्ञाच्यावेळी काल रात्री पंजाब शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी मंडपात येऊन धुडगूस घालून आमदार नागेश पाटील व त्यांचे पुत्र युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या सहकार्यांनी तो हाणून पाडला. या संबंध प्रकरणाची तसेच यामागे नेमका मास्टर मार्इंड कोण याचा शोध घेण्याची मागणी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना आज निवेदन देवून केली आहे.
काल रात्री हदगाव येथे शिवसेना आमदार नागेश पाटील यांच्या पुढाकारातून सुरु असलेल्या दरवर्षीच्या दुर्गा महोत्सवात शतचंडी यज्ञाचे व विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हदगाव तालुक्यात वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकलेला पंजाब शिंदे हा आपल्या सहकार्यांसह थेट मंडपात आला आणि त्याने त्याठिकाणी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी त्याचीच समर्थक असलेल्या एका तरुणीने मला कृष्णा पाटील आष्टीकर यांचा सत्कार करायचा आहे, असा अट्टाहास धरला. मात्र आपल्याला हा सत्कार घ्यायचा नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. पंजाब शिंदे व त्यांचे सहकारी तेथे आले असता त्यांनी या मंडपात मोटारसायकल घालून देवीच्या मूर्तीसमोर धुडगूस घातला. त्यांच्या हातात विषारी औषधाची बाटल देखील होती. तेथे येण्यापूर्वीच त्याने हे विषारी औषध अंगावर टाकून घेतले होते. आपल्या काही साथीदारांसह त्यांनी आमदार नागेश पाटील व कृष्णा पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी तो हाणून पाडला आणि पंजाब शिंदे व त्यांच्या सहकार्यांना मंडपातून हाकलून दिले.
ज्या तरुणीच्या हस्ते कृष्णा पाटील यांचा सत्कार व्हायचा होता, त्यातील पुष्पहार तपासून बिघतला असता त्यात पतंगाला लावण्यात येणारा मांजा अडकवून ठेवण्यात आला होता. या मांजानेच त्यांच्यावर हल्ला करायचा असा त्यांचा डाव होता, असेही आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी यावेळी सांगितले. दोन दिवसापूर्वीच दुर्गा महोत्सवाच्या वर्गणीवरुन दोन गटात बाचाबाची झाली होती आणि संयोजन समितीच्या सदस्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होता. त्यावेळी देखील आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण मिटविले होते. त्यातूनच चिडून जावून हा हल्ला झाल्याचे आष्टीकर यांचे म्हणणे आहे. या सबंध प्रकरणाची चौकशी करुन हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे, येणार्या बाजार समितीच्या निवडणूका तसेच लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आपल्या हातून कुठले वाईट कृत्य व्हावे व आपली बदनामी व्हावी असा डाव होता, मात्र आपण हे प्रकरण संयमाने घेतले.
या सबंध प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, व यातील पाळेमुळे शोधून काढावीत, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना हि बाब कळताच त्यांनी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करुन चौकशी केली. तसेच रात्री एक वाजता मुख्यमंत्री कार्यालयातून स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाबद्दल माहिती घेतली. गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनीही आमदार आष्टीकर यांना फोन करुन विचारपूस केली आणि पोलिसांना याबाबत योग्य त्या सूचना दिल्या.

































































