
गप्पा मारत बसलेल्या दोन मित्रांवर दोघांनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास दांडेकर पुलाजवळ घडली. शुभम सिताराम डोलारे आणि रोहन राजू कदम अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांचा मित्र प्रेम माने (वय 19, रा. दत्तवाडी) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री तीन मित्र दांडेकर पूलाजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या दोघांनी कोयत्याने शुभम आणि रोहन यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. प्रेम यांनी आरडाओरडा करेपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वाय. बी. पाटील अधिक तपास करीत आहेत.


























































