
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. या निमित्त तुळजाभवानी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रांजणगाव येथील देवीभक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर – पाटील यांच्या वतीने ही सेवा करण्यात आली आहे. मंदिर सजावटीसाठी सुमारे अडीच टन फुलांचा वापर करण्यात आलेला आहे.
शेवंती गुलाब झेंडू ऑर्किड यासह विविध फुलांचा वापर करून मंदिर सजविण्यात आले आहे.आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात आज विधिवत पूजा करुन घटस्थापना करण्यात आली. कल्लोळ तीर्थातून नद्यांचं जलपूजन करण्यात आलं.
तुळजाभवानी मंदिरात आगामी 9 दिवस देवीचा नवरात्र उत्सव चालणार आहे. देवीच्या अलंकारांची पूजा केली जाईल. तसंच छबीना देखील निघणार आहे. देवीचे मंदीर, गाभारा आणि परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आला आहे. देवीच्या गाभाऱ्यात असलेल्या घटाला पाणी देत कोणते धान्य जास्त उगवून येतं, यावर पीक पाण्याची स्थिती ठरते.