
मुलाखत- नमिता वारणकर,[email protected]
साहित्य… संगीत सृष्टीतील स्त्रीचे भरीव योगदान रसिकांसमोर आणण्याचा अनोखा प्रयत्न अरुण दातेंचे सुपुत्र अतुल दाते करीत आहेत.
साहित्य, काव्य आणि संगीत कला ही पूर्वीच्या काळापासून आजही पुरुषांच्याच हाती आहे असं मानलं जातं; मात्र कवयित्री, गीतकार, संगीतकार, कथालेखिका, दिग्दर्शिका, निर्मात्या अशा अनेक कलाक्षेत्रांत स्त्रियांनीही मोलाचे योगदान दिले आहे… जुन्या काळातील कवयित्री आणि स्त्री गीतकार म्हणून सर्वप्रथम संत जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा यांचे अभंग… त्यानंतरच्या काळात बहिणाबाई, शांता शेळके, इंदिरा संत यांच्या रचना आजही आठवतात… लोकप्रिय गीतं लिहिणाऱया वंदना विटणकर… ‘आनंदघन’ अर्थात लता मंगेशकर यांनी अनेक गीतं अजरामर केली… मीना मंगेशकर यांनी मुलांच्या भावविश्वात… किशोरीताई आमोणकर यांनी शास्त्रीय संगीतसृष्टीत रंग भरले… आताच्या काळातल्या नव्या स्त्री कलाकारांनीही आपल्याला अनोखा ठेवा मिळवून दिलाय… कलासृष्टीतील गुणवंत स्त्रियांना मानाचा मुजरा करण्यासाठी ‘ललना मना’ हा गाण्यांसह रंजक किस्से सांगणारा अनोखा कार्यक्रम सादर होत आहे.
माणिक एण्टरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाविषयी अतुल अरुण दाते सांगतात, कला, विद्या, प्रज्ञा आणि प्रतिभा स्त्री लिंगी शब्द असले तरीही साहित्य आणि संगीतसृष्टीत स्त्रियांच योगदान ते किती, या प्रश्नाचं उत्तर शोधताना एक रत्नमंजुषाच हाती आली. मग संत मुक्ताबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई यांच्यावरील लिखाण वाचलं. स्त्रियांनी कवयित्री, कथालेखिका, दिग्दर्शिका म्हणूनही काम केलंय. संत स्त्रियांची अभंगही नव्या पिढीपर्यंत पोहोचावे या विचारातून साहित्य, काव्य, संगीतसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतील जुन्या-नव्या पिढीतील महिलांच्या योगदानावर आधारित कार्यक्रम सादर करण्याच्या कल्पनेने उचल घेतली.
या कार्यक्रमात कवयित्री आणि स्त्री गीतकार यांच्या कविता आणि गीतांचा, स्त्री गीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा, स्त्री चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका, कथालेखिका यांच्या चित्रपटातील गाण्यांचा समावेश असेल. वेगळी माहिती देणारा, रंजक किस्से सांगणारा आणि रसिकांना आवडणारी गाणी ऐकवणारा असा श्रवणीय कार्यक्रम रसिकांना नक्कीच आवडेल. बऱयाच नवोदित कलाकारांचा यामध्ये सहभाग आहे.

साधारणपणे आपल्याकडे महिलांवरील कार्यक्रम महिला दिनी साजरे करण्याची प्रथा आहे. स्त्रीच महत्व हे फक्त महिलादिनी नसावं. स्त्रियांनी गायलेली, त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आपण एरवीही गुणगुणतो. त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट कधीही पाहता येतात, मग त्याचं कौतुक फक्त महिलादिनीच करायला हवं असं नाही, तर ते केव्हाही करता यायला हवं. तसेच संतकवी पुरुषही आपल्याकडे होऊन गेले तेवढय़ाच मोठय़ा संत कवयित्रीही होऊन गेल्या आहेत हेही यामुळे रसिकांना कळावं ही या कार्यक्रमामागची प्रमुख भूमिका आहे, असे मत प्रस्तुतकर्ते अतुल अरुण दाते व्यक्त करतात.
वडिलांच्या नावाखेरीज हा पहिलाच कार्यक्रम सादर करताना काय भावना आहेत असे विचारता ते सांगतात, वडिलांच्या आशीर्वादानेच माझ्या आयुष्यात सारं काही घडलं. माझ्यामध्ये जे काही चांगलं आहे ते त्यांचं आहे आणि जे वाईट आहे ते माझं आहे. तसेच गाण्याच्या कार्यक्रमाचे सादरीकरण घडवून आणणं हेच त्यांच्यावर झालेले गाण्याचे संस्कार आहेत असे ते मानतात. याविषयीची एक आठवण ते उलगडून सांगू लागतात, वयाच्या 12व्या वर्षीच माझा आवाज चांगला नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर मी कधीही गाण्याचा प्रयत्न केला नाही. उलट गायलो नाही तर घराण्यावर उपकार होतील असा विचार केला. कारण आवाजाची देणगी ईश्वराकडून मिळावी लागते. ती नसेल तर मुद्दामहून गाण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे लोकं नावं ठेवतात. मी गायल्यामुळे माझ्या वडिलांना कोणी नाव ठेवलं असतं, त्यांच्यावर टीका केली असती तर ते मला आवडलं नसतं. म्हणून प्रत्यक्ष न गाता सादरीकरणाच्या माध्यमातून नेहमीच काहीतरी नवीन द्यायचा आम्ही प्रयत्न केलाय. ‘ललना मना’ या नव्या संकल्पनेचाही प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा. यातून नक्कीच त्यांना कलाक्षेत्रातील स्त्रियांची गाथा नव्या पद्धतीने बघायला आणि ऐकायला मिळेल.
कार्यक्रमाचं अनोखेपण…
मुंगी उडाली, नको देवराया, संतभार पंढरीत हे संत कवयित्रींचे अभंग, जात्यावरच्या पारंपरिक ओव्या, खोप्यामधी खोपा, अरे संसार संसार, परिकथेतील राजकुमारा, शारद सुंदर ही बहिणाबाई, वंदना विटणकर, इंदिरा संत यांची गाणी, शांता शेळके यांची कोळीगीतं, गायिका अश्विनी शेंडे हिचं ओल्या सांजवेळी, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे यांच्या ‘मितवा’ सिनेमातील सावर रे हे गीत, पद्मजा फेणाणी यांनी संगीतबद्ध केलेलं ‘दिवे लागले रे’ या गीतांसह अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, क्रांती रेडकर, दिग्दर्शिका कांचन अधिकारी, लता नार्वेकर, भारती आचरेकर, रेणू देसाई यांची निर्मिती असलेल्या चित्रपटातील गाणी… असा एकापेक्षा एक अनोख्या, सुरेल गाण्यांचा नजराणा रसिकांसमोर ‘ललना मना’द्वारे उलगडणार आहे.


























































