
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई क्राइम ब्रांचने कुर्ल्यातील खान दांपत्याला मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या १३ वर्षांच्या मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करून पोलिसांनी त्याला पालकांकडे आणून दिले. तसेच मुलाचे अपहरण करणार्या त्याच्या सख्ख्या काकीसह चौघांना बेड्या ठोकून युनिट-४ च्या पथकाने धडक कामगिरी केली.
कुर्ला पश्चिमेकडील म्हाडा कॉलनीत बाफना मोटर्समध्ये मॅनेजरचे काम करणारे अलीम खान त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहतात. ३ ऑगस्टच्या सायंकाळी त्यांचा १३ वर्षीय मुलगा आमीरचे त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीखालून अपहरण झाले होते. याप्रकरणी विनोबा भावे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-४ ने गुह्याचा तत्काळ समांतर तपास सुरू केला. पथकाने खबर्यांना कामाला लावून शोधमोहीम हाती घेतली तेव्हा गोवंडी येथे एका मुलाला सुलतान खान (२६)याच्या कार्यालयात डांबून ठेवल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले, एपीआय विनोद माळवे, अंमलदार नार्वेकर, शिरगावकर, गुरव, बल्लाळ, मांढरे, पिलवटे, साळुंखे या पथकाने सुलतानच्या शिवाजीनगरातल्या म्हाडा येथील कार्यालयात धडक दिली त्यावेळी आमीर खान (१३) हा मुलगा तेथे सापडला. मुलाला सुखरूप ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आमीरचे अपहरणकर्ते सुलतान खान, जहांगीर हैदरअली शेख (२८), विल्यम ऊर्फ सोहेल सिद्धिकी (३३), गुफरान शेख (२६) आणि आमीरची काकी शबिना खान (२७) या पाच जणांच्या मुसक्या आवळल्याचे उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.
आरोपींनी ठरल्याप्रमाणे आमीरचे अपहरण केले, पण मुलाच्या वडिलांकडे पैसे मागण्यासाठी कोणाच्या फोन नंबरवरून कॉल करायचा असा पेच निर्माण झाला. मग आरोपींनी काही तरी झोल करून बनावट सीमकार्ड मिळविण्यासाठी खटाटोप सुरू केला. सीमकार्ड नसल्याने आरोपींनी पैशांची मागणी करण्यासाठी मुलाच्या वडिलांना फोनच केला नाही. खंडणीसाठी फोन करण्याआधीच पोलिसांनी अपहरणकर्त्यांनाच उचलून त्यांचा डाव खल्लास केला.
दोन कोटी मागून ५० लाखांचा सौदा
इस्टेट एजंटचे काम करणार्या शबिनाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे तिने दिराच्या मुलाचे अपहरण करण्याचा कट रचला. यासाठी तिने ओळखीच्या चौघांना हाताशी घेतले. मुलाचे अपहरण केल्यानंतर दिराकडे दोन कोटींची मागणी करायची आणि तडजोडीअंती ५०लाख काहीही करून घ्यायचे असे अपहरणकर्त्यांनी ठरवले होते.
- बनावट डीडीद्वारे पैशाचा झोल करायचे फसल्यामुळे शबानाने रचला दिराच्या मुलाच्या अपहरणाचा कट.
- दोन दिवस मुलाला अन्नपाण्याविना बंद घरात डांबून ठेवले.
- वेळीच पोलिसांनी सुटका केली, अन्यथा अनर्थ घडला असता.
- अपहरण केल्यानंतर शबानाच आमीरचा शोध घेण्याचे नाटक करत होती.
आरोपींनी शबानाच्या दिराच्या लहान मुलाला टार्गेट केले होते. त्यांना दहा वर्षांच्या मुलाचे अहपरण करायचे होते पण अपहरणकर्त्यांच्या हाती मोठा भाऊ लागला. आरोपींनी कट रचल्यानंतर ३ तारखेला शबानाने तिच्या नणंदेला फोन करून मुलाला खाली पाठविण्यास सांगितले. त्यानुसार आमीर इमारतीखाली आला. आधीच सापळा लावून बसलेल्या आरोपींनी आमीरला जबरदस्तीने रिक्षात बसवले आणि मारहाण व चाकूचा धाक दाखवून त्याचे अपहरण केले.

























































