संभाजीनगरात केंद्राचे पथक दाखल, स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात

शहरात गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छता अभियानांतर्गत केंद्राचे पथक स्वच्छतेच्या पाहणीसाठी दाखल झाले आहे. या पथकाने मनपाकडून सर्व माहिती घेत शहराच्या विविध भागात जाऊन सार्वजनीक आणि वैयक्तीक शौचालयांसह गायरान जमीन, नाले, एसटीपी प्लांट आणि बाजारपेठांची पाहणी करत आहेत. दुसरे पथक गुरुवारी येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

केंद्राच्या संपूर्ण स्वच्छता अभियानात गेल्या वर्षी शहराला चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे यंदा मोठया प्रमाणात मनपाकडून तयारी करण्यात आली आहे. केंद्राचे एक पथक मंगळवारी शहरात दाखल झाले. या पथकाने मनपातून गुगल मॅपव्दारे संपूर्ण माहिती घेतली. या पथकाने पहिल्या दिवशी खडकेश्वर येथील रस्ता, त्या रस्त्यावरील दुकानांकडे स्वच्छता ठेवण्यासाठी काय सुविधा आहे. तेथील सफाई कशी आहे, याची पाहणी केली. मिलिंद कॉलेज परिसरातील गायरान आणि बुढीलेन परिसरातील नागरी वसाहतीत जाऊन पाहणी केली. हर्सुल येथे शौचालये आणि सेंट्रल नाक्यासह मध्यवर्ती बस स्थानकातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करण्यात आली. बुधवारी चौधरी कॉलनी, मिसारवाडी, आरतीनगर, जयसिंगपूरा, रात्री उशिरा चिकलठाणा परिसरात पथक पाहणी करत होते. त्यांच्यासोबत मनपाचे शहर समन्वयक अभियंता किरण जाधव यांच्यासह त्या त्या भागातील स्वच्छता निरीक्षक होते. गुरुवारी आणखी एक पथक येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या