संभाजीनगर समुह संसर्गाच्या वळणावर; पुढील पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मनपा प्रशासकांचा इशारा

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असलातरी आता आपण समुह संसर्गाच्या वळणावर आहोत. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने शहरासाठी पुढील पाच दिवस महत्वाचे आहेत असा इशारा महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला. संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही, तर स्वयंशिस्त हाच एकमेव पर्याय आहे. त्यातही मास्कला पर्याय नाही असे ते म्हणाले.

आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले, कोरोना संसर्गाचा आजार हा वैद्यकीय व्यवस्थापनाचा विषय (मेडिकल अ‍ॅडमिनीस्ट्रेशन) आहे. कोरोनाचे रुप रोज बदलते. नाशिक, नागपूर सारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या लाख-सव्वा लाखांच्यावर गेली आहे. शहरात मात्र ही संख्या 26 हजारांवर थांबली आहे. शहरवासियांचे बेशिस्त वर्तन असताना व या वर्तनाने दिवाळीच अत्युच्च टोक गाठलेले असताना देखील शहरामधील कोरोनाबाधितांची संख्या 26 हजारांवरच आहे. डेथरेट अडिच टक्क्यांवर आला आहे. दिवाळीच्या काळातील बाजारपेठांमधील गर्दीमुळे रुग्ण संख्या वाढेल असे मानले जात आहे.

दिवाळी संपून आता दहा दिवस झाले आहेत. दहा दिवसात रुग्ण वाढ झाली पण त्याचे प्रमाण फार नाही. रुग्ण वाढीच्या दृष्टीने पुढचे पाच दिवस (30 नोव्हेंबर पर्यंत) महत्वाचे आहेत. या पाच दिवसात शहरातील रुग्ण संख्या रोज तिनशे- चारशेच्या घरात गेली तर दुसरी लाट आली आहे, असे म्हणता येईल. दीड-दोनशे पर्यंत रुग्ण संख्या राहिली तर लाटेचे स्वरुप भीषण असणार नाही असा उल्लेख त्यांनी केला. शहराची स्थिती नियंत्रणात आहे, निर्बंधांची गरज नाही पण मास्कशिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले.

कोमऑर्बिट नागरिकांवर लक्ष केंद्रीत करणार

महापालिकेने सर्वाधिक म्हणजे तीन लाखावर नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. त्यातून 46 हजार नागरिक कोमऑर्बिट (विविध आजार असलेले) आढळले आहेत, या नागरिकांवरच लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवण्यात आले आहे असे पाण्डेय यांनी स्पष्ट केले. आता रँडम टेस्टिंगची गरज नाही, त्यामुळे शहराच्या एन्ट्री पॉइंटवर देखील पथके असणार नाहीत असे ते म्हणाले. आता ज्या काही कोरोना चाचण्या होतील त्या आरटीपीसीआर पध्दतीच्या असतील असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या