
येत्या सोमवारी लोकप्रतिनिधीसोबत बैठक होणार असून, या बैठकीत शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज शुक्रवारी दिली. कोरोना रुग्ण संख्या वाढत असली तरी प्रशासन खंबीर असल्याने शहरवासीयांनी भीती बाळगु नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संभाजीनगर शहरात दरदिवशी सुमारे २०० पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे. या पाश्र्वभुमीवर प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषदेत शहरातील कोरोनाच्या प्रादुर्भावा बाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, घाटीच्या अधिष्ठाता कानन येळीकर यांची उपस्थिती होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोकण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असले तरी शहरवासीयांचा सहभाग असला तरच कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होऊ शकतो. कोरोनाच्या आजाराचे लक्षणे बदलत आहेत. त्यामुळे अशी काही लक्षणे असल्यास आजार अंगावर काढु नका, असे स्पष्ट करतांनाच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शहरवासीयांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे कृपया उगाच घराबाहेर पडु नका. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिस्त पाळतांना त्यासाठी ठरवून दिलेले निकष पाळणे अत्यंत गरजेचे आहे. शहरातील कोरोनाची सद्य परिस्थिती पाहता पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत त्यांनी यावेळी संकेत दिले. ते म्हणाले, सोमवारी लोकप्रतिनिधी सोबत बैठक होणार असून, या बैठकीत लॉकडाऊबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.