संभाजीनगर – महापौर घोडेले यांनी भरली 400 लाभार्थ्यांची रक्कम, विटखेड्यात मोफत धान्य वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसमुळे हातावर पोट असणाऱ्यांची परवड होत असून, महापौर नंदकुमार घोडेले लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसांपासून अशा नागरिकांची मदत करत आहेत. विटखेडा प्रभागातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 150 येथे नोंदणी असलेल्या सुमारे 400 जणांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. या सर्वांचे पैसे महापौर नंदकुमार घोडेले यांनी भरले.

विटखेडा येथे अनिता मंत्री यांचे स्वामी समर्थ रेशन दुकान आहे. याठिकाणी सुमारे 400 खातेधारक आहेत. रेशन दुकानांवर धान्य पुरवठा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार एप्रिल महिन्यासाठी गहू व तांदळाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांचे उत्पन्नच बंद झाले आहे. त्यांची अडचण लक्षात घेऊन महापौर घोडेले यांनी धान्याचे शुल्क स्वतः भरून नागरिकांना मोफत धान्य मिळवून दिले. असा उपक्रम शहरात प्रथमच राबविण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले यांनी यावेळी नमूद केले. नायब तहसीलदार सिद्धार्थ धनगकर, महापालिकेतील माजी विरोधीपक्षनेते रावसाहेब गायकवाड तसेच संजय खडके, स्वच्छता निरीक्षक बबन आवळे, सतीश निकम, भागचंद मोटे, बाबासाहेब खडके, गौतम सोनवणे, भगवान गायकवाड, जयश्री इंदापूरे, संगिता बनकर, अनिल वाघलगावे, वसंत शर्मा, रवींद्र सेठिया, निवृत्ती भानुसे, राजू बनकर यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते.