
सामना प्रतिनिधी । ठाणे
दहावीची परीक्षा जवळ आलीये.. तू अभ्यास का करीत नाहीस, असे संभाजीनगरातील गाजगाव येथे राहणाऱया सागर शिरसाठ याला त्याच्या आईने खडसावून विचारले. त्यावर थोडी बाचाबाची झाली आणि घरातून रागावून तो पळाला. त्याने थेट संभाजीनगर रेल्वे स्टेशन गाठले व नंदीग्राम एक्सप्रेसने तो कल्याण रेल्वे स्थानकात उतरला. फलाटावर फिरत असतानाच पोलिसांनी त्याला हटकले. त्याची चौकशी केली तेव्हा आपण घरातून पळून आल्याची कबुली त्याने दिली. मात्र रेल्वे पोलिसांनी फोनवरून त्याच्या पालकांशी संपर्क साधला आणि मोठय़ा प्रयत्नाने सागरला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. पळालेला मुलगा 24 तासांत सापडल्याचा आनंद पालकांच्या चेहऱयावर दिसत होता.
सागर शिरसाठ हा गाजगाव येथील ज्ञानमंदिर विद्यालयात शिकतो. त्याला एकूण तीन भावंडे असून आई शोभा ही मोलमजुरी करते, तर वडील महेंद्र शिरसाठ हे दिव्यांग असून घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. दहावीची प्रीलियम परीक्षा सुरू होत असल्याने आईने अभ्यासाकडे लक्ष दे, टंगळमंगळ करू नकोस, असे सांगितले. त्यामुळे सागरला राग आला आणि तो घरातून कोणालाही न सांगता मंगळवारी सकाळी एक्सप्रेसने कल्याणवर आला. फलाट क्रमांक 1 ए वरून जात असताना विलास म्हेतर या प्रवाशाने बघितले. त्याने थेट स्टेशनमास्तर आणि लोहमार्ग पोलिसांना ही माहिती दिली.
.. आणि आनंदाश्रू तरळले
डय़ुटीवर असलेले रघुनाथ रणधीरे, सदाशिव शिंदे, दत्तात्रय लवंगारे या पोलिसांनी सागर शिरसाठ याला पोलीस ठाण्यात नेऊन त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने आपण घरातून रागावून आलो असल्याची कबुली दिली. त्याच्याकडे पैसेही नव्हते. पोलिसांनी त्याच्या जेवणाची तसेच चहा-पाण्याची व्यवस्था केली. सागर याला उल्हासनगरातील बालसुधारगृहात पाठविण्यात येणार होते. मात्र त्याच्या अभ्यासाचे नुकसान होऊ नये म्हणून पोलिसांनी संभाजीनगर येथे पालकांना फोन करून मुलगा सापडल्याचे सांगितले. आई शोभा शिरसाठ हिने तातडीने कल्याण गाठले आणि पोलीस ठाण्यात येऊन सर्व हकीकत सांगितली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांच्या मार्गदर्शनानुसार सागरला पुन्हा त्याच्या आईच्या ताब्यात दिले. आपला लाडका मुलगा सुखरूप सापडल्याने आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. तुम्ही देवासारखे भेटलात, अशा शब्दात तिने पोलिसांचे आभार मानले.

























































