तिहेरी हत्याकांडाने पैठण हादरले, एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि 9 वर्षीय चिमुकलीची हत्या

पैठण शहर शनिवारी भल्यापहाटे तिहेरी हत्त्याकांडाच्या घटनेमुळे हादरून गेले. गोदावरीच्या काठावरील कावसन (जुने) येथे मध्यरात्रीनंतर एकाच कुटुंबातील पती, पत्नी व 9 वर्षीय चिमुकली अशा तीन जणांचा  तीक्ष्ण हत्याराने खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या भयंकर हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लहान मुलावर संभाजीनगरच्या घाटीत उपचार सुरू आहेत.

संभाजी ऊर्फ राजू निवारे (35), अश्विनी राजू निवारे (30) व मुलगी सायली राजू निवारे (9) अशी खून झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून, संभाजीनगर येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक गोरक्ष भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, फौजदार सी. जी. गिराशे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेहांचा पंचनामा केला.

पोलीस उपनिरीक्षक मिलिंद कुलकर्णी, पोलीस हवालदार पठाण, गणेश व्यवहारे हे पोलीस श्वान स्विटीसह तपास करीत आहेत. या घटनेत मुलगा सोहम निवारे (6) याच्यावरही वार करण्यात आले असून, तो गंभीर जखमी झाल्याने संभाजीनगर येथील घाटीत हलविण्यात आले आहे. संतापजनक बाब म्हणजे मृत सायली राजू निवारे या मुलीला गळा चिरून ठार मारण्यात आले. अत्यंत नृशंस पद्धतीने घडविलेल्या या हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली असून, मयतांची सर्व पार्श्वभूमी तपासून खुन्याचा शोध हाती घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या