पीएम केअर फंडातून मिळालेलें व्हेंटिलेटर्स कुचकामी, केंद्र सरकारचा रुग्णांच्या जिवाशी खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील अनेक रुग्णालयांना पीएम केअर फंडातून देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स बोगस निघत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहे. अशी सुमार दर्जाची उपकरणे देऊन केंद्र सरकारने गंभीर रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू केल्याची भावना व्यक्त होत असून, राज्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

कोरोना विषाणूने राज्यात मोठ्या प्रमाणात थैमान घातल्याने या आजारावर नियंत्रण व्हावे आणि गंभीर रुग्णांचा जीव वाचावा यासाठी जून महिन्यापासून केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे सहाय्य आणि मदत निधी (पी. एम. केअर फंड) सर्वच राज्यांना जीवरक्षक प्रणाली म्हणजेच व्हेंटिलेटर्स पुरवले. यासाठी सरकारने मे महिन्यात तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा निधी उभा केला.

दरम्यान, देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे पीएम केअर फंडातून आजवर राज्याला या निधीतून 1129 व्हेंन्टिलेटर्स देण्यात आले. मराठवाड्यासाठी पहिल्या टप्प्यात 100 आणि दुसर्‍या टप्प्यात 50 असे 150 व्हेंटिलेटर्स देण्यात आले. त्यापैकी अनेक ठिकाणचे व्हेंटिलेटर्स बंद अवस्थेत आणि नादुरुस्त असल्याने केंद्राने चक्क गंभीर रुग्णांच्या जिवाशीच खेळ सुरू केल्याची सर्वत्र ओरड होऊ लागली.

शहरातील घाटी रुग्णालयातील गंभीर रुग्णाला व्हेंटिलेटर लावताना ते बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तपासणी केली असता सर्वच व्हेंटिलेटर बंद असल्याचे लक्षात आले. मात्र सरकारची इभ्रत कायम राखण्यासाठी भाजपच्या खासदार आमदारांनी दिल्लीश्वरांकडे पाठपुरावा करून या बंद व्हेन्टिलेटरच्या दुरुस्तीसाठी टीम पाठविण्याची विनंती केली. त्यानंतर आज महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी देण्यात आलेल्या पीएम केअर फंडातील व्हेन्टिलेटरची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

लेथ मशीन बनविणार्‍या कंपनीला व्हेंटिलेटरची ऑर्डर

ही दुरुस्ती करत असताना ज्योती कंपनीच्या या व्हेंटिलेटरच्या दुरुस्तीलाही मर्यादा आल्या. मुळात गुजरातमधील राजकोट येथील ही कंपनी लेथ मशिन बनविणारी कंपनी असून तिला व्हेन्टिलेटर बनविण्याची ऑर्डर देण्यात आली आहे. या कंपनीकडे व्हेन्टिलेटर बनविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने या कंपनीने बनविलेले व्हेन्टिलेटर सूमार दर्जाचे आहेत असा अहवालच संभाजीनगरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. या संतापजनक प्रकारामुळे केंद्राचे पितळ उघडे पडले आहे. पंजाब सरकारने तर हे व्हेंटिलेटरच परत करून  गुजरातनेही हे व्हेंटिलेटर वापरण्यास नकार कळवून केंद्राला घरचा आहेर दिला आहे.

केंद्राचा व्हेंटिलेटर स्वस्त; डॉक्टर आणि रुग्ण त्रस्त

संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील व्हेंटिलेटरवरून चांगलाच गदारोळ झाला. येथील लोकप्रतिनिधींनी हे व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याचा भंडाफोड करताच भाजपचे राज्यसभेचे सदस्य डॉ. भागवत कराड यांनी उत्कृष्ट दर्जाचे  व्हेंटिलेटर 50 लाखांत मिळत असल्याचे सांगून केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर 12 लाखांचे असल्याचे सांगून ते सुमार दर्जाचे असल्यावर जणूकाही शिक्कामोर्तबच केले आहे.

मराठवाड्यात व्हेन्टिलेटर सेवेची दाणादाण

राज्यातील 1129 व्हेन्टिलेटरपैकी मराठवाड्यात 150 व्हेन्टिलेटर देण्यात आले. त्यापैकी बरेच निकृष्ट दर्जाचे निघाले. यामध्ये हिंगोली, धाराशिव, परभणी आणि बीड जिल्ह्यांना देण्यात आलेल्या 55 पैâकी ऑक्सिजन सॅच्युरेशन व्यवस्थित होत नसल्याने बहुतांश व्हेंटिलेटर बंदच आहेत. संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात पहिल्या टप्प्यात दिलेले 42 व्हेन्टिलेटर तर बंदच असल्याची माहिती दोन महिन्यांपूर्वी किरीट सोमय्या सांच्यासमोरच अधिष्ठातांनी दिली होती.

घाटीत ज्योती कंपनीचे व्हेन्टिलेटर बोगस

घाटी रुग्णालयात आजवर भारत इलेक्ट्रॉनिक्सची 42, एइओ कंपनीची 10, एग्वा कंपनीची 32, ज्योती सीएनसी कंपनीची 100 आणि दुसर्‍या टप्प्यात 50 असे एकूण 234 व्हेन्टिलेटर  आले यापैकी ज्योती कंपनीचे ‘ज्योती सीएनसी धमन-3’ या व्हेंटिलेटर वापरण्यास योग्य नसल्याचा अहवाल तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर नादुरुस्त

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था व रुग्णालयात 97 व्हेंटिलेटर आले असून, ते कार्यान्वित असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले. बीड जिल्ह्यात 250 पैकी तब्बल 75 व्हेंटिलेटर बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परभणी जिल्ह्यात आलेले 87 व्हेंटिलेटर आले असून त्यापैकी कीती यंत्रे बंद आहेत हे समजू शकले नाही. हिंगोली जिल्ह्यात 112 पैकी 3 नादुरुस्त असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात 149 पैकी 7 व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

मराठवाड्याला दिलेले व्हेंटिलेटर सदोष -आमदार सतीश चव्हाण

दरम्यान, कोरोना संकटाचा मुकाबला करणार्‍या मराठवाड्याला पी एम फंडातून पुरवण्यात आलेले व्हेंटिलेटर  सदोष आहेत असा भंडाफोड राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे. घाटी रुग्णालयास भेट देऊन व्हेंटिलेटर ची पाहणी करून घेतलेल्या पत्रकार परिषदेत या सर्व प्रकरणाची चौकशी करून केंद्र सरकारने हे व्हेंटिलेटर बदलून देण्याची मागणी त्यांनी केली.