
‘देशात काय चाललेय कळत नाही. दिल्ली मुडद्यांचे शहर वाटते. संसद मूक, बधीर झाली आहे. विरोधक मुक्त हिंदुस्थानच्या ध्येयाने सत्ताधारी पिसाटले आहेत. अशा सगळय़ा वातावरणात उद्धव ठाकरे यांच्या रूपाने देशाला एक प्रकाशाचा किरण गवसला आहे. त्यांनी आता देशाचे नेतृत्व केले पाहिजे.’
संभाजीनगर, दि. 28 (प्रतिनिधी) – सध्या देशात काय चालले आहे हे मलाच काय कुणालाही कळत नाहीय. देशाची राजधानी दिल्ली मुडद्यांचे शहर बनल्यासारखे वाटते. कुणाचाच आवाज दिल्लीत ऐकू येत नाही. संसद मूक, बधीर झाली आहे. विरोधक मुक्त हिंदुस्थानच्या ध्येयाने सत्ताधारी पिसाटले आहेत. अशा सगळय़ा वातावरणात देशाला उद्धव ठाकरे यांच्या रूपाने एक प्रकाशाचा किरण गवसला आहे. भाजपच्या दमनशाहीला उत्तर देण्यासाठी यूपीएचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे असून त्यासाठी काँग्रेसला नुसता पुढाकार घेऊन चालणार नाही तर त्याग करावा लागेल. काँग्रेसच्या त्यागावरच देशाचे पुढील राजकीय भविष्य अवलंबून आहे अशी स्पष्टोक्ती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली.
नगरसेवक चेतन कांबळे यांच्या वतीने आयोजित जयभीम फेस्टिव्हलचा आज प्रारंभ झाला. या फेस्टिव्हलमध्ये आज प्रसिद्ध पत्रकार राजू परुळेकर यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेतली. देशात सध्या घटनेची पायमल्ली करणारे वातावरण आहे. विरोधी विचारच नको अशी भूमिका घेऊन सत्ताधारी सुडाचे राजकारण करत आहेत या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी सध्याच्या राजकारणाचे पदरच उलगडून सांगितले. पंडित नेहरूंना मोदी पाण्यात पाहतात. देशात जे काही घडले ते फक्त या सात वर्षातच घडले असा प्रचार केला जातो. नेहरूंच्या मंत्रिमंडळात पाच बिगर काँग्रेसी मंत्री होते त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश होता. विरोधकांना सोबत घेऊन जाण्यासाठी एक दृष्टी लागते. विरोधकांना संपवण्यासाठी इंदिरा गांधी यांनीही कधी एवढी पातळी गाठली नाही असे ते म्हणाले. सध्याच्या या सुडाचे राजकारणाची धग देशाला कुठे जाईल हे माहिती नाही पण याचे गंभीर परिणाम मात्र भोगावे लागतील असा स्पष्ट इशारा संजय राऊत यांनी दिला. सरकारमधील तीनही राजकीय पक्षात कोणतीही मतभिन्नता नाही. पण सरकारला कोणताही धोका नसल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
केंद्रीय संस्थांचा बेफाम गैरवापर
काँग्रेसच्या काळातही सीबीआय, ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा एवढा गैरवापर झाला नाही. जे विरोधात बोलतात त्यांच्यामागे या संस्था हात धुवून लागतात. या दंडेलशाहीच्या विरोधात कुणीही आवाज उठवत नाही. काळा पैसा आणू वगैरे नुसत्या वल्गनाच ठरल्या. सात वर्षात असा काय बदल झाला? हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास माझ्यामुळे हिरावला असे त्यांना वाटते. त्यामुळे ईडीच्या नथीतून शरसंधान करण्यात आले. बायकांना काय नोटीसा देता, आम्ही आहोत ना तुमच्याशी दोन हात करायला समर्थ, असे आव्हानच यावेळी संजय राऊत यांनी दिले.
राहुल गांधी हे प्रामाणिक नेते
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अतिशय सरळ, प्रामाणिक नेते आहेत. पण राहुल गांधी यांचे नेतृत्व खच्ची करण्याचे काम सध्या होतेय. त्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली गेलीय. काँग्रेसची शकले पाडण्यात येत आहेत. सत्ताधाऱयांच्या ‘विरोधक मुक्त हिंदुस्थान’ या भूमिकेचा राहुल गांधी बळी ठरले आहेत. राज्यकर्ता हा दिलदार असावा. पण इथे मनच नाहीयत, त्यामुळे अपेक्षा पुणाकडून करणार असे संजय राऊत म्हणाले.
शरद पवार यांच्याकडे यूपीएचे नेतृत्व द्यावे
भाजपप्रणित एनडीए अस्तित्वातच नाही आणि काँग्रेसप्रणित यूपीएचे अस्तित्व दिसत नाही. सध्याच्या राजकीय परिस्थितीत यूपीएचे पुनर्गठन होणे गरजेचे आहे. पण प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वात काम करायला तयार नाहीत. शरद पवार यांच्याकडे यूपीएचे नेतृत्व दिले तर ममता बॅनर्जी, प्रकाशसिंग बादल सगळेच येतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.
राजभवनातून समांतर सरकार चालत आहे
आंध्रात रामलाल आणि उत्तरप्रदेशात रोमेश भंडारी या राज्यपालांनी कारकीर्द कुख्यात आहे. महाराष्ट्रातही सध्या काही वेगळे घडत नाहीय. राजभवनातून समांतर सरकार चालत असल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने बारा आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवली. आठ महिन्यांपासून राज्यपाल ती यादी तपासत आहेत. हे योग्य आहे का? आपल्या विचारांचे सरकार यावे असे राज्यपालांना वाटते. त्यासाठी राजभवनाची तडफड चालू आहे. राज्य सरकारशी असहकार केला जातोय. दुसरीकडे राजभवनात पहाटेचे शपथविधी होतात असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
पटेलांचा पुतळा काढला तर आश्चर्य नाही
सध्या दिल्लीत नवी संसद उभारण्यात येत आहे. जुनी संसद पत्र्याने झाकलीय. म्हणजे केवळ संसद नाही झाकली तर इतिहासच बंद केला आहे. जुन्या संसदेला नेहरू ते मोदीपर्यंतचा इतिहास आहे. पण दिल्लीचा माहौलच बदललाय. असे प्रकार दिल्लीत घडत आहेत. तिकडे स्टेडियमला पंतप्रधानांचे नाव दिले. उद्या पटेलांचा पुतळा काढला तर त्यात आश्चर्य नाही असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
































































