संभाजीनगरात सारीचे 19 रुग्ण , आरोग्य यंत्रणेपुढे नवीन आव्हान

4731

संभाजीनगर शहरात कोरोना विषाणूने दहशत पसरली असतानाच सारी या आजाराचे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा चक्रावून गेली आहे. काल गुरुवारी एकट्या घाटी रुग्णालयात सारी चे 9 रुग्ण उपचार घेत होते तो आकडा वाढून आज 12 पर्यंत पोहोचला असून शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा 7 रुग्ण सारी वर उपचार घेत आहेत. तथापि या सर्व 12 रुग्णांच्या स्वाबचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला असून ते सर्व सारीचा उपचार घेत असल्याची माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी आज दिली. त्यामुळे आता सारी रुग्णांची संख्या 19 वर पोहोचल्याने आरोग्य खात्याचे धाबे दणाणले आहे.

संभाजीनगर शहरात कोरोना विषाणूच्या फैलावा विषयी प्रशासन आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सतर्क झाले आहेत. तथापि शहरात आरोग्य यंत्रणा आणि महापालिका यांच्या वतीने नागरिकांचे स्क्रिनिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या स्क्रिनिंग दरम्यान घाटी रुग्णालयात गुरुवारी नऊ रुग्ण सारी आजाराने त्रस्त असलेले दाखल झाले. तो आकडा वाढून आज 27 रोजी दुपारपर्यंत बारावर पोहोचल्याची माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉक्टर केळकर यांनी दिल. याशिवाय शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये सात रुग्ण सारी आजारावर उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेला घाम फुटला आहे.

दुसरीकडे कोरोना विषाणू विषयी स्क्रीनिंगही शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात एक प्राध्यापिका सोडली तर संभाजीनगरात दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. असे असले तरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कसून कामाला लागली आहे.

कोरोना विषाणू संदर्भातील तपासणी आज अखेरच्या दिवशी महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार दैनिक संशयित 10, एकूण संशयित 97, एकूण भरती व्यक्ती 44, एकूण तपासणी केलेले नमुने 97, पाठपुरावा सुरू असलेल्या एकूण व्यक्ती 713, विमानतळावर स्क्रिनिंग केलेले एकूण व्यक्ती 4806, घाटी रुग्णालयात भरतीसाठी पाठवलेले रुग्ण 3, कलाग्राम अलगीकरण कक्षात असलेले व्यक्ती 11.

आपली प्रतिक्रिया द्या