
राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला.
त्यानुसार संभाजीनगर मनपा क्षेत्र असलेल्या शहरातील विद्यार्थ्यांना 3 जानेवारीपर्यंत शाळेत गैरहजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे आदेश मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी काढले आहेत.
दिवाळी आधीच राज्य सरकारने इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि दिवाळीनंतर राज्याच्या काही भागात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळा उघडायच्या की नाही, याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
दिवाळीपूर्वी शहरातील कोरोना बाधितांची संख्या चांगलीच आटोक्यात आली होती. मात्र दिवाळीनंतरच्या तीनच दिवसात 404 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील विद्यार्थ्यांना 3 जानेवारीपर्यंत गैरहजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र शिक्षकांना शाळेत हजेरी लावण्याचे बंधनकारक करण्यात आले असून ऑनलाईन वर्ग घ्यावे लागणार आहेत.



























































