जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व; गलांडे, राठोड, बलांडे यांची सभापतीपदी निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने 4 पैकी 3 जागा निवडून वर्चस्व सिद्ध केले असून, एक जागा भाजपकडे गेली आहे. शिवसेनेचे अविनाश गलांडे, मोनाली राजेंद्र राठोड, किशोर बलांडे, तर भाजपच्या अनुराधा चव्हाण बिनविरोध निवडून आल्या.

जिल्हा परिषद विषय समिती सभापतींच्या निवडणुकीसाठी 10 जणांनी अर्ज दाखल केले होते. समाजकल्याणसाठी मोनाली राठोड, रमेश पवार, विजय चव्हाण, महिला व बालकल्याणसाठी मोनाली राठोड व अनुराधा चव्हाण, तर विषय समितीच्या दोन जागांसाठी शिवसेनेकडून अविनाश गलांडे, रमेश पवार, किशोर बलांडे, काँग्रेसकडून श्रीराम महाजन, पंकज ठोंबरे यांनी अर्ज दाखल केले. दुपारी 3 वाजता पीठासीन अधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. महिला व बालकल्याणसाठी दाखल केलेला अर्ज मोनाली राठोड यांनी मागे घेतला. तर समाजकल्याणसाठी असलेले अर्ज विजय चव्हाण, रमेश पवार यांनी मागे घेतले. त्यामुळे समाजकल्याण सभापतीपदी मोनाली राठोड, तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अनुराधा चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर विषय समित्यांच्या दोन जागांसाठी पंकज ठोंबरे यांनी दाखल केलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे अविनाश गलांडे, श्रीराम महाजन, किशोर बलांडे, रमेश पवार यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. अविनाश गलांडे व किशोर बलांडे यांना सर्वपक्षीय 60 सदस्यांनी मतदान केले. एका सदस्याने मतदानात सहभाग घेतला नाही. प्रत्येकी 60 मतदान झाल्यामुळे शिवसेनेचे गटनेते अविनाश गलांडे व किशोर बलांडे यांची सभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

आईनंतर मुलगी झाली सभापती
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांच्या कन्या असलेल्या मोनाली राठोड-पवार आज सभापती पदावर बिनविरोध निवडून आल्या. विशेष म्हणजे मोनाली राठोड यांच्या आई विमल राजेंद्र राठोड 21 डिसेंबर 2009 रोजी शिवसेनेच्या तिकिटावर समाजकल्याण समितीच्या सभापती म्हणून निवडून आल्या होत्या. एकाच खुर्चीवर आई आणि मुलगी निवडून आल्याची ही पहिलीच घटना म्हणावी लागेल.

सासू गेल्याचे दु:ख
समाजकल्याण सभापती मोनाली राठोड यांच्या सासू दुर्गाबाई पवार यांचे महिनाभरापूर्वीच निधन झाले. विजयी झाल्यानंतर त्या दालनात येताच त्यांना अश्रू अनावर झाले होते. एकीकडे निवडीचा आनंद आणि दुसरीकडे सासू गेल्याचे दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. आपेगावसारख्या दुर्गम भागातून आलेल्या माझ्यासारख्या महिलेला शिवसेनेने सभापती केल्याचा आनंद होत आहे. समाजकल्याणच्या योजना प्रभावीपणे राबवून तळागाळातील जनतेला त्याचा लाभ मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विश्वास दाखविल्याबद्दल महिला व बालविकास सभापती अनुराधा चव्हाण यांनी सर्वपक्षीय सदस्यांचे आभार मानले.

जास्तीत जास्त काम करू
सर्वपक्षीय सदस्यांनी आम्हाला मतदान करून निवडून आणले. त्या सदस्यांचे आभार आम्ही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आगामी दोन वर्षांत जास्तीत जास्त काम करून विकास करू, असा विश्वास नवनिर्वाचित सभापती अविनाश गलांडे व किशोर बलांडे यांनी व्यक्त केला.

जि.प. आवारात जल्लोष
जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतीपदी शिवसेनेचे अविनाश गलांडे, मोनाली राठोड, किशोर बलांडे, भाजपच्या अनुराधा चव्हाण यांची निवड होताच फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला. यावेळी नेतेमंडळी, पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.