
सीएमओ ट्विटर हँडलवर ‘संभाजीनगर’ झळकल्यानंतर सुरू झालेल्या चर्चांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. संभाजीनगर उल्लेखाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ‘त्यात नवीन काय केलंय…?’ असा प्रतिसवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
‘जे वर्षानुवर्षे बोलत आलो आहे, जे स्वतः शिवसेनाप्रमुखांनीही केलं आहे, तेच करणार आणि तेच स्वीकारणार असे ठणकावतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘औरंगजेब हा सेक्युलर नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात सेक्युलर हा जो शब्द आहे त्यात औरंगजेब बसत नाही,’ असे सांगत महाविकास आघाडीच्या अजेंड्याचीही आठवण करून दिली.
महाविकास आघाडी सरकारने संभाजीनगर जिल्ह्याबाबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती ‘संभाजीनगर’ या उल्लेखासह सीएमओ ट्विटर हँडलवर प्रसिद्ध झाली. यावरून औरंगाबाद जिल्ह्याचा उल्लेख संभाजीनगर आल्याचा गवागवा सलग दोन दिवस करण्यात येत होता. त्यावर काँग्रेस नेत्यांसह अन्य पक्षाच्या नेत्यांनीही उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या.
महाविकास आघाडी सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चालत असल्याचाही उल्लेख प्रतिक्रियांतून करण्यात आला होता. वर्षा या निवासस्थानी पत्रकारांनी यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच वाक्यात उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली.
कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये ‘सेक्युलर’ शब्द असल्याची आठवण करून देतानाच औरंगजेब हा सेक्युलर नव्हता हेही ठणकावले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही संभाजीनगरच अपेक्षित होते, हे अधोरेखीत करीत यापुढेही संभाजीनगरच राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट केले.
नाशिकवर अधिक ताकदीने भगवा फडकवू
जुने शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत आलेत त्यांचं मी शिवसेनेत स्वागत करतो. नाशिक महापालिकाच नाही तर नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मधल्या काळात थोडी फाटाफूट झाली होती, म्हणून थोडं इकडे तिकडे झाले. पण आता सर्व जुनी-नवी मंडळी एकत्र आल्याने पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने नाशिकवर शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.





























































