AUS Vs WI – पहिल्या दिवसावर विंडीजचे वर्चस्व

तिसऱ्या दिवस-रात्र कसोटीत वेस्ट इंडीजने पहिल्या दिवसावर पूर्ण वर्चस्व गाजवले. यजमान संघाच्या वेगवान गोलंदाजांनी, विशेषतः शमार जोसेफच्या चार विकेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 225 धावांत गुंडाळला.  त्यानंतर पहिल्या दिवसअखेर वेस्ट इंडीजची 1 बाद 16 अशा स्थिती होती. विंडीजकडून शमार जोसेफने 33 धावांत 4 विकेट देत प्रभावी कामगिरी केली, तर जस्टिन ग्रिव्ह्स आणि जेडेन सील्स यांनी प्रत्येकी तीन विकेट टिपल्या.  प्रकाशझोतात खेळ सुरू झाल्यानंतर गवताळ खेळपट्टीवर आणि हलक्याशा हालचाली होणाऱ्या चेंडूंवर वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी परिस्थितीचा जबरदस्त लाभ उठवला. 19 वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू सॅम कॉन्स्टास याच्यासाठी ही दौऱ्यातील आणखी एक अपयशी खेळी ठरली. त्याला पहिल्या सत्रात जस्टिन ग्रिव्ह्सने 17 धावांवर  पायचीत  केले.

उस्मान ख्वाजाही (23) लवकर बाद झाला. त्यानंतर कॅमेरून ग्रीन (46) आणि स्टीव्ह स्मिथ (48) यांनी 61 धावांची भागीदारी करत डावाला थोडी स्थिरता दिली, परंतु दोघांनाही अर्धशतक गाठता आले नाही. ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतला डाव प्रकाशझोतात पूर्ण कोलमडला. ट्रव्हिस हेड (20), वेबस्टर (1) आणि अॅलेक्स केरी (21) हे तिघेही लवकर माघारी परतले.