
रोहित शर्माच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलिया दौऱयावर गेलेल्या हिंदुस्थानला सलग दुसऱया एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. दोन्ही सामन्यात हिंदुस्थानी गोलंदाजांची धुलाई झाली अन् यजमान कांगारूंनी धावांची लयलूट करून लागोपाठच्या विजयासह ही तीन सामन्यांची मालिका आधीच खिशात टाकली. ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 390 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ‘टीम इंडिया’ला 9 बाद 338 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली आणि ऑस्ट्रेलियाने 51 धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. सामनावीराची माळ शतकवीर स्टीवन स्मिथच्या गळ्यात पडली.
– सलामीच्या जोडीचा फ्लॉप शो
ऑस्ट्रेलियाच्या 389 धावांना प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानची सलामीची जोडी अपयशी ठरली. जोश हेजलवूडने आठव्याच षटकात शिखर धवनला (30) स्टार्पकरवी झेलबाद करून ऑस्ट्रेलियाला आश्वासक सुरुवात करून दिली. पॅट कमिन्सने पुढच्याच षटकात दुसरा आघाडीवीर मयांक अग्रवालला (28) यष्टीमागे अॅलेक्स पॅरीकरवी झेलबाद केले.
– विराट, राहुलची झुंज
हिंदुस्थानच्या 2 बाद 60 अशा निराशाजनक सुरुवातीनंतर कर्णधार विराट कोहली व श्रेयस अय्यर मैदानावर आले. मोइसेस हेन्रीक्सने अय्यरला (38) स्मिथकरवी बाद केले. मग विराट व आलेला लोकेश राहुल यांनी चौथ्या गडय़ासाठी 72 धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र देघे बाद झाल्यानंतर हिंदुस्थानच्या आशांना सुरुंग लागला. 87 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 89 धावा फटकाविणाऱया विराटला हेजलवूडने हेन्रीक्सकरवी झेलबाद केले, तर 66 चेंडूंत 5 षटकार व 4 चौकारांसह 76 धावा करणाऱया लोकेश राहुलला अॅडम झम्पाने हेजलवूडकरवी झेलबाद केले. शेवटी हार्दिक पांडय़ा (28) व रवींद्र जाडेजा (24) हेही चमत्कार करू शकले नाही.
– सलग दुसरी शतकी सलामी
त्याआधी, पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमान ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानच्या गोलंदाजांची पुन्हा धुलाई केली. डेव्हिड वॉर्नर (83) व कर्णधार अॅरोन फिंच (60) यांनी सलग दुसऱया सामन्यात शतकी सलामी (142 धावा) देत ऑस्ट्रेलियाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. या सामन्यातही हिंदुस्थानला पहिल्या बळीसाठी 23 व्या षटकापर्यंत वाट बघावी लागली. मोहम्मद शमीने फिंचला कोहलीकरवी बाद करून हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर 77 चेंडूंत 3 षटकार व 7 चौकारांसह सुस्साट सुटलेला वॉर्नर हा श्रेयस अय्यरच्या थ्रोवर धावबाद झाला.
– स्मिथचे सलग दुसरे शतक
सलामीच्या लढतीत 105 धावा करणाऱया स्टिव्हन स्मिथने पुन्हा एकदा हिंदुस्थानी गोलंदाजांवर हल्लाबोल करत सलग दुसरे, तर कारकीर्दीतील 11 वे वन डे शतक झळकावले. त्याने 64 चेंडूंत 104 धावा करताना 2 षटकारांसह 14 चेंडू सीमापार पाठविले. स्मिथने मार्नस लॅबुशेन (70) याच्या साथीत तिसऱया विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. हार्दिक पांडय़ाने स्मिथला शमीकरवी झेलबाद करून ही जोडी पह्डली. त्यानंतर लॅबुशेनने आलेल्या ग्लेन मॅक्सवेलच्या साथीने 80 धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला साडेतीनशेचा टप्पा ओलांडून दिला. 61 चेंडूंत 5 चौकार लगावणाऱया लॅबुशेनला जसप्रीत बुमराहने मयांक अग्रवालकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला चौथे यश मिळवून दिले. मॅक्सवेलने पुन्हा एकदा 29 चेंडूंत नाबाद 63 धावांची वादळी खेळी करताना 4 षटकार व तितक्याच चौकारांचा घणाघात केला. हिंदुस्थानकडून शमी, बुमराह व हार्दिक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
– 14 महिन्यांनंतर हार्दिकची गोलंदाजी
दुखापतीतून पूर्णतः सावरल्यानंतर हार्दिक पांडय़ाने तब्बल 14 महिन्यांनंतर गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 24 धावांच्या मोबदल्यात 1 बळी टिपला. हार्दिकने याआधी गतवर्षी 22 सप्टेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बंगळुरूतील टी-20 सामन्यात गोलंदाजी केली होती. आयपीएलमध्ये हार्दिक पांडय़ाने
14 सामन्यांत 281 धावा फटकावल्या, पण त्याने गोलंदाजी केली नव्हती.
– हिंदुस्थानविरुद्ध प्रथमच शतकी सलामीची हॅटट्रिक
हिंदुस्थानने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 978 सामने खेळले, मात्र प्रतिस्पर्धी संघाने सलग तीन सामन्यांत शतकी भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ होय. डेव्हिड वॉर्नर व अॅरोन फिंच जोडीने रविवारी 142 धावांची सलामी दिली. याच जोडीने 27 नोव्हेंबरला पहिल्या सामन्यात 156 धावांची सलामी दिली होती. त्याआधी मार्टिन गप्टिल व हेन्री निकोलस या न्यूझीलंडच्या जोडीने हिंदुस्थानविरुद्ध 11 फेब्रुवारीला 106 धावांची सलामी दिली होती.
दृष्टिक्षेपात…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 22 हजार धावांचा पल्ला गाठणारा पहिला विराट कोहली पहिला फलंदाज.
अडीचशे एकदिवसीय सामने खेळणारा विराट कोहली हिंदुस्थानचा नववा फलंदाज.
मागील पाच लढतींत पॉवर प्लेमध्ये हिंदुस्थानी गोलंदाज बळी मिळविण्यात अपयशी.


























































