आपण एवढे संवेदनशील आहोत…??

459

>> आशीष पाटील, पर्यावरणतज्ञ

दीड आठवडय़ापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या अरण्यात भीषण आग लागली. असंख्य प्राणी, पक्षी, वृक्ष आगीशी झुंजू लागले. अनेक प्राणी भक्ष्यस्थानी पडले. पण बरेचसे वन्यजीव, हजारो वृक्ष वाचवण्यात यश आले. यात मुख्य सहभाग होता सामान्य नागरिकांचा. ज्याला जे जे सुचेल ते त्यानं केलं. पण प्राण्यांना वाचवलं… आपल्याकडेही वणवे लागतात. नव्हे लावले जातात… आरेचे अरण्य ही ताजी घटना. यावर फक्त चर्चेची गुऱ्हाळं बसतात, मेणबत्ती मोर्चे निघतात. तथाकथित प्राणीप्रेमी मिरवून घेतात. पण खरोखरच आपले प्राणी, वृक्षसंपदा आपण वाचवू शकतो… सामान्य माणूस यासाठी मनापासून रस्त्यावर येतो…???

जागतिक पातळीवर या वर्षी घडलेली अतिशय गंभीर घटना म्हणजे ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेली आग. बऱयाच दिवसांपासून सुरू असलेल्या या अग्निकांडात अनेक दुर्मिळ वृक्ष, प्राणी, पशु-पक्षी यांचा बळी गेला. मात्र या अत्यंत ह्रदयद्रावक घटनेतही तेथे लागलेला हा वणवा विझवण्यासाठी तेथील नागरिकांनी निकराने प्रयत्न केले…अनेकांनी शक्य असेल तिथे, अगदी आपल्या वाहनांतही प्राण्यांना आसरा दिला…अग्निशमन जवानांनी तातडीने राबवलेली सिंचन, ऑपरेशन रॉक वॉल्बी…नागरिकांनी मदतीकरिता विविध पद्धतींनी पुढाकार घेतला… तत्पर यंत्रणांमुळेही दाट जंगलात आढळणारे वृक्ष वाचवण्यात त्यांना यश आले… निसर्गाच्या या इशाऱ्यावरून आपण शहाणपण शिकणे गरजेचे आहे.

ऑस्ट्रेलियातील संवेदनशील नागरिकांनी काय केले?
l जंगलात अडकलेल्या उपाशी प्राण्यांसाठी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून भाज्या तसेच फळांचा वर्षाव केला गेला. जंगलातील आगीत सर्वाधिक नुकसान प्राणी तसेच विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळण्यासह अधिकाधिक संख्येत प्राणी, पक्षी आणि वन्य प्रजातींना वाचवण्यासाठी प्राधान्य दिले गेले.
l प्रत्येक नागरिकांनी पीडितांना मदत केली. त्यांना उचलून प्रेमाने जवळ घेतले. त्यांची भीती दूर करण्यासाठी प्रयत्न केले. प्राणी आणि पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठीदेखील नागरिकांनी धडपड केली.
l अचानक उद्भवलेल्या या भीतिदायक घटनेमुळे घाबरलेल्या प्राण्यांना नीट पाणीही पिता येत नव्हते. अशा प्राण्यांना ड्रॉपरने पाणी पाजले. काहींनी स्वतःच्या अंगावरील कपडे प्राण्यांना पांघरण्यास देऊन त्यांना प्रेमाची ऊब दिली.
l आगीत होरपळलेल्या स्टीव्ह आयर्विन यांच्या वन्यप्रेमी कुटुंबीयांनी तब्बल 90 हजार प्राण्यांचे जीव वाचवले. त्यांच्यावर स्वतः प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णालयात दाखल केले.
l ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज शेन वॉर्न याने त्याच्या ग्रीन टेस्ट कॅपचा लिलाव केला. त्याच्या कॅपला 10 लाख 7 हजार 500 ऑस्ट्रेलियन डॉलर्स एवढी किंमत मिळाली. हिंदुस्थानी चलनात ही किंमत 4 कोटी 92 लाख 8 हजार रुपये एवढी होते. आगीतील पीडितांच्या मदतीसाठी त्याने हे पैसे दान केले.
– रिकी पॉटिंग आणि शेन वॉर्न या ऑस्ट्रेलियाच्या दोन दिग्गज खेळाडूंनी आगीत होरपळलेल्या मदत करण्यासाठी एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या तिकिटातून जमा होणारा पैसा ऑस्ट्रेलियातील आगीमध्ये नुकसान झालेल्या प्राण्यांच्या पुनर्वसनासाठी मदत म्हणून दिला जाणार आहे.
l इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही बिग बॅश लिगमधून निधी गोळा केला.
l सर्वसामान्य नागरिकांनी प्राण्यांवर पाण्याचा वर्षाव करून त्यांचे आगीत होरपळलेले शरीर थंड केले. त्यांना धीर दिला.

वन्य आणि जीवसृष्टीच्या संरक्षणाचा विचार करता आपल्याकडे निसर्गपरिचय शिबीर, निसर्ग प्रदर्शन केंद्रांची स्थापना होणं गरजेचं आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पर्यावरण सहलीचे अशा ठिकाणी आयोजन करणं बंधनकारक असायला हवे. त्या अनुषंगाने या मुलांना आपण निसर्ग शिबिरात नेऊ शकलो तर तिथे वणवा म्हणजे काय याचे प्रात्यक्षिक दाखवू शकलो. तर मुलांना याचा परिचय होईल. प्राण्यांचे महत्त्व आणि त्यांचा आपल्या आयुष्यावर असलेला प्रभाव यात आजही दरी आहे असं वाटतं. कारण शहरी मुलांसाठी प्राणी म्हणजे कुत्रा, मांजर, कबूतर, कावळा याव्यतिरिक्तही नैसर्गिक सृष्टी आहे. त्याची ओळख प्रत्येकाला होणं गरजेचे आहे. हे माहीत नसल्यामुळे याविषयी जिव्हाळा निर्माण होत नाही. त्यामुळे तिच्या रक्षणासाठी अपेक्षित प्रयत्न कमी होतात. जास्तीत जास्त पर्यटन आणि निसर्गाची ओळख झाली तर जीवसृष्टी आणि मानवी सृष्टीविषयी आपुलकी निर्माण करण्याचा पाया उभा राहू शकतो.

ऑस्ट्रेलिया हा थंड प्रदेश आहे. थंड प्रदेशातल्या झाडांमध्ये तेल जास्त प्रमाणात असते. त्यामुळे त्याची ज्वलनशीलता जास्त असते. तिकडे बर्फ पडतो किंवा थंडी मानवण्यासाठी तेथील झाडांमध्ये तेलांचं प्रमाण निसर्गतःच जास्त असतं. मोठय़ा वाऱ्याने जेव्हा झाडं एकमेकांवर आदळतात किंवा घर्षण होतं तेव्हा आग लागते. याउलट आपल्याकडे माणसामुळे लागलेला वणवा जास्त असतो. बिडी फुंकून तशीच फेकून दिल्यामुळे आग लागते किंवा कचरा जाळण्यासाठी आग लावली जाते. भातलावणीच्या आधीही शेतात आग लावतात, अशा प्रकारे हवेने पसरलेली आग आपल्याकडे बऱ्याचदा कारणीभूत आहे. दुसरं एक कारण आहे की, बऱयाचदा ऑनिमल ह्युमन कनफ्लिक्ट म्हणजे प्राण्यांनी येऊ नये म्हणून जंगलेच जाळून टाकली जातात. अशा प्रकारे आपल्याकडे लागलेली आग ही मानवी चुकांमुळे लागलेली असते. नैसर्गिक आग लागण्याची शक्यता फारच कमी असते.

नैसर्गिक वृक्ष, प्राणी, वनस्पती यांच्या मदतीकरिता तिथल्या नागरिकांमध्ये जागरूकता आहे, तशी जागरूकता आपल्या लोकांमध्येही यायला हवी. जाऊ लागली आहेत. काही तरुण जंगलांची सफाई, किल्ले सफाई या सगळय़ा मोहिमा राबवतात. वणवा बुजवण्यासाठी वॉलिंटियर ग्र्रूपही असतात. काही स्वयंसेवी संस्थाही मदत करतात. प्राण्यांच्या नैसर्गिकरीत्या वणवा लागण्याची शक्यता कमी आहे.

ऐनवेळी नैसर्गिक वणवा पेटला तर…
ऐनवेळी वणवा पेटल्यावर उपाय म्हणून महाराष्ट्रात मेळघाटात जमिनीवर साधारण 5 ते 10 फूट रुंदीचे आणि 1 मीटर खोल असे चर खणलेले असतात. यामुळे आग जर जमिनीवरून पसरत असेल तर त्यामध्ये अडथळा निर्माण होतो. आगीवर नियंत्रण ठेवण्यास हा उपाय कामी येतो. यामुळे रानटी जनावरांनाही फायदा होतो. वाऱ्याची दिशा जर वाढली तर खालून जी आग पेटत जाते तशी पेटली जात नाही. कान्हेरी गुंफामध्ये आग लागण्याचं प्रमाण जास्त आहे. तिथेही अशा प्रकारचे चर खणले गेले आहेत. शिवाय सोलर पंप, बोअरवेलमधील पाण्याचाही यासाठी उपयोग होतो.

आपण काय शिकायला हवं?
l देशावर ओढवलेल्या एवढय़ा मोठय़ा संकटाला तोंड देण्यासाठी ऑस्ट्रेलियन नागरिकांना आपआपल्या पद्धतीने सहाय्य केले. प्राण्यांना जिथे जमेल त्या जागी राहण्याची सोय उपलब्ध करून दिली.
l तीन मिनिटांच्या वर आग गेली तर ती आटोक्यात आणणं मनुष्याला कठीण जातं. त्यामुळे आगीचं वय कमी करणं गरजेचं आहे. याकरिता त्यांची यंत्रणा कमीत कमी वेळात कामाला लागली हे शिकणं जास्त गरजेचं आहे.
l महत्त्वाचे म्हणजे लाखो किलोमीटर जंगल जळालं त्याच्यापुढे माणूस फिका पडणारच, मात्र यावर मात करण्यासाठी आवश्यक असणारा ऍक्शन प्लान त्यांच्याकडे तयार आहे.
l ऑस्ट्रेलियाचे वैशिष्टय़ असलेल्या कोआलांची शिकार केली गेली. ही प्रजाती नष्ट होण्याची भीती निर्माण झाली तेव्हा त्यांना वाचवण्याचे विशेष प्रयत्न सुरू केले गेले.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या