AUS Vs WI : विंडीजही 190 धावांवर गारद

जेडेन सिल्स आणि शामर जोसेफ या वेगवान जोडीपुढे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 180 धावांत गारद झाला होता. मात्र ऑस्ट्रेलियाने विंडीजला कालच 4 बाद 57 असा धक्का दिला होता आणि आज दुसऱया दिवसाच्या पहिल्या-दुसऱया सत्रात स्टार्क, हेझलवूड, कमिन्स आणि वेबस्टर या गोलंदाजांच्या चौकडीने यजमान वेस्ट इंडीजचा पहिला डाव 190 धावांत गुंडाळत आपला बदला घेतला.

कालच्या 4 बाद 57 या अडखळलेल्या सुरुवातीनंतर ब्रॅण्डन किंगही लवकर बाद झाला, पण त्यानंतर कर्णधार रोस्टन चेस आणि शाय होप यांनी 67 धावांची भागी रचत संघाला सावरले. पण कमिन्सने ही जोडी फोडल्यानंतर वेबस्टरने होप (48) आणि जस्टिन गिव्हजचा (4) अडसर दूर केला. त्यानंतर स्टार्कनेही शामर जोसेफचा त्रिफळा उडवत विंडीजची 9 बाद 171 अशी अवस्था केली. मात्र त्यानंतर अल्जारी जोसेफने तडाखेबंद 23 धावा ठोकत विंडीजला 10 धावांची का होईना, आघाडी मिळवून दिली.