
कोरोनामुळे उद्भवलेल्या मंदीमुळे जगभरात लाखो लोकांनी नोकऱया गमावल्या आहेत. दुसरीकडे मात्र रस्त्यावर भटकणाऱया मांजरीला एका रुग्णालयात चक्क सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळाल्याची घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे. एलवूड असे या मांजरीचे नाव असून तिला रिचमोंड शहरातील एपवर्थ हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळालीय. गळ्यात रुग्णालयाचे ओळखपत्र घालून सध्या ती रुग्णालयाच्या गेटवर फिरतेय. गेटच्या बाहेर येणाऱया-जाणाऱयांना छान स्माईल देऊन वेलकम करणे हीच तिची डय़ूटी. तिला पाहून नकळत सर्वांच्या चेहऱयावर हसू उमलते. सर्वांचे स्वागत करणारी एलवूड सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलीय. एलवूडला नोकरीला ठेवण्याचा किस्साही रंजक आहे. साधारण एका वर्षापासून एलवूड रुग्णालयाच्या बाहेर भटकताना स्टाफला दिसायची. शेवटी रुग्णालयाच्या टिमने तिला नोकरीला ठेवण्याचा निर्णय घेतला. पगार म्हणून तिची देखभाल केली जाते आणि तिला आवडीचे खाद्यपदार्थ दिले जातात.





























































