
सोमवारीच श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून त्यांच्यावर टी-20 वर्ल्ड कपच्या साखळीतच गारद होण्याची टांगती तलवार ठेवली होती तर आज पावसाने झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला आणि रद्द सामन्यातून मिळालेल्या एका गुणामुळे झिम्बाब्वेने ‘ब’ गटातून सुपर एटमध्ये धडक मारली तर ऑस्ट्रेलियाचा साखळीतच खेळ खल्लास झाला. तब्बल 17 वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाचा संघ सुपर एटमध्ये पोहोचू शकला नाही, तर दुसरीकडे टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात झिम्बाब्वे प्रथमच सुपर एटमध्ये पोहोचला.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच पावसामुळे लढत रद्द करावी लागली. आजचा सामना झिम्बाब्वेच नव्हे तर ऑस्ट्रेलियासाठीही महत्त्वाचा होता. आयर्लंडलाही सुपर एटची अंधुक आशा होती. त्यामुळे आजच्या सामन्यावर सर्वांचे लक्ष लागले होते, पण दुर्दैवाने पावसाने आजच्या लढतीचा घात केला आणि आपोआप ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड साखळीतच गारद झाले तर झिम्बाब्वेने अंतिम आठ संघांत स्थान मिळवण्याचा करिश्मा केला. सुपर एटचे चित्र सोमवारीच स्पष्ट झाले होते.
तर पाकिस्तानचे पॅकअप ः बुधवारी पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यात साखळी सामना खेळला जाणार असून यात पाकिस्तान जिंकला तर ते आरामात सुपर एट गाठतील. तसेच पावसामुळे सामना रद्द झाला तर त्यांचा. प्रवेश निश्चित आहे. मात्र नामिबियाने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला तर धावगतीत पाकिस्तानपेक्षा पुढे असलेला अमेरिकन संघ सुपर एटमध्ये पोहोचू शकतो. फक्त हा चमत्कार नामिबियाने करून दाखवायला हवा. या धक्क्यामुळे पाकिस्तानचे पॅकअप होऊ शकते आणि अमेरिकेला सलग दुसऱयांदा सुपर एटची लॉटरी लागू शकते.
सर्व काही ठरल्याप्रमाणेच
आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपचा कार्यक्रम जाहीर करताना अव्वल आठ संघांना दिलेली क्रमवारी आणि क्रमवारी लाभलेले आठपैकी सात संघ सुपर एट गाठणार आहेत. एक्स 2 ही क्रमवारी लाभलेला ऑस्ट्रेलिया बाद झाल्यामुळे आता त्या क्रमवारीचे सामने झिम्बाब्वे खेळेल. आतापर्यंत ‘अ’ गटातून हिंदुस्थान, ‘ब’ गटातून श्रीलंका, झिम्बाब्वे, ‘क’ गटातून वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि ‘ड’ गटातून दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड हे संघ पात्र ठरले आहेत. आता केवळ ‘अ’ गटातनू पाकिस्तानच्या प्रवेशाची औपचारिकता पूर्ण व्हायची आहे. जर नामिबियाने पाकिस्तानला हरवले तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल आणि अमेरिकेचा संघ सुपर एटचा मानकरी ठरेल. हा सामना बुधवारी कोलंबोत खेळला जाणार आहे.
17 वर्षांनंतर पराभव पुनरावृत्ती
ऑस्ट्रेलियन संघ म्हणजे सर्वाधिक उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळणारा संघ. पण या संघाला 2009 सालच्या वर्ल्ड कपमध्ये साखळीतच पराभवाचा धक्का बसला होता. त्यांचा संघ साखळीत वेस्ट इंडीज आणि श्रीलंका या संघाविरुद्ध हरला आणि त्यांचे आव्हान साखळीतच संपले होते. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनंतर त्यांच्यावर तशी नामुष्की ओढावली आहे. त्यांनी 2021 साली जगज्जेतेपदही पटकावले होते. मात्र यंदा पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन पराभवांमुळे त्यांची वाट आधीच कठीण झाली होती. तरीही ते आयर्लंड जिंकतील या आशेवर होते आणि पावसाने त्यांच्या आशेवरच पाणी फेरले.
झिम्बाब्वेसाठी सोनेरी कामगिरी
झिम्बाब्वेसाठी सुपर एटचा टप्पा गाठणे खूप मोठी कामगिरी ठरली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आधीच खळबळ माजवली होती आणि आता सुपर एटमध्ये आपले नाव नोंदवत ते आणखी एक पाऊल पुढे गेले आहेत. त्यांनी आजवर एकदाही सुपर एटची पायरी गाठली नव्हती. त्यांच्या संघाला गतवेळी पात्रताही लाभली नव्हती. अशा संघासाठी सुपर एटमध्ये प्रवेश मिळवणेच मोठे यश मानले जात आहे.
सुपर एटच्या लढती
21 फेब्रु. – न्यूझीलंड-पाकिस्तान कोलंबो
22 फेब्रु. – श्रीलंका-इंग्लंड पाल्लेकेले
22 फेब्रु. – हिंर्दुंस्थान-द. आफ्रिका अहमदाबाद
23 फेब्रु. – वेस्ट इंडीज-झिम्बाब्वे मुंबई
24 फेब्रु. – इंग्लंड-पाकिस्तान पाल्लेकेले
25 फेब्रु. – श्रीलंका-न्यूझीलंड कोलंबो
26 फेब्रु. – द. आफ्रिका-विंडीज अहमदाबाद
26 फेब्रु. – हिंदुस्थान-झिम्बाब्वे चेन्नई
27 फेब्रु. – इंग्लंड -न्यूझीलंड कोलंबो
28 फेब्रु. – श्रीलंका-पाकिस्तान पाल्लेकेले
1 मार्च – द. आफ्रिका-झिम्बाब्वे दिल्ली
1 मार्च – हिंदुस्थान-वेस्ट इंडीज कोलकाता
























































