ऑस्ट्रियात दहशतवादी हल्ला, चारजण ठार; 17 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहशतवादी हल्ल्याने ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना हादरली. अंधाधुंद गोळीबार करीत केलेल्या हल्ल्यात चार नागरिक ठार झाले तर, 17 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी हल्लेखोर एका दहशतवाद्याचा खात्मा केला. दरम्यान, या हल्ल्याचा हिंदुस्थान, अमेरिका, फ्रान्ससह अनेक देशांनी निषेध केला आहे.

vienna-asutria-attack

कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे ऑस्ट्रियामध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र, लॉकडाऊनपूर्वी लोक मोठय़ा प्रमाणावर जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी व्हिएन्ना येथे बाहेर पडले होते. बार आणि रेस्टॉरंटमध्ये गर्दी होती.

रात्री आठच्या सुमारास एका दहशतवाद्याने अनेक ठिकाणी अंधाधुंद गोळीबार केला. यामुळे प्रचंड अफरातफरी माजली. गोळीबारात दोन महिला आणि दोन पुरुष ठार झाले. 17 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी हल्लेखोर दहशतवाद्याचा खात्मा केला.

रेड अलर्ट; सुरक्षा वाढविली

ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबेस्टियन पुर्ज यांनी दहशतवाद्यांसमोर कधीच झुकणार नाही. हल्ल्याचा मास्टरमाईंड शोधून काढू, असे सांगितले. दरम्यान, व्हिएन्नात सर्वत्र बंदोबस्त वाढविण्यात आला असून, रेड अलर्ट जारी केला आहे. महत्त्वाच्या इमारतींना लष्करी सुरक्षा दिली असून लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.