
सामना ऑनलाईन | लंडन
कर्णधार ऍरोन फिंचची दीडशतकी खेळी… स्टीव्हन स्मिथचे दणकेबाज शतक आणि त्यानंतर मिचेल स्टार्कच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर कांगारूंनी श्रीलंकेचा 87 धावांनी धुव्वा उडवून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील चौथा विजय साकारला. सामनावीराची माळ अर्थातच दीडशतकवीर ऍरोन फिंचच्या गळ्यात पडली.
ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 335 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 45.5 षटकांत 247 धावसंख्येवर संपुष्टात आला. कर्णधार दिमुथ करुणारत्ने (97) व कुसल परेरा (52) यांनी 15.3 षटकांत 115 धावांची सलामी देत श्रीलंकेला खणखणीत सुरुवात करून दिली होती. परेराने 36 चेंडूंत 5 चौकारांसह 1 षटकार लगावला, तर करुणारत्नेने 108 चेंडूंत 9 चौकार लगावले. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर कुसल मेंडीस (30) व लाहिरू थिरिमाने (16) वगळता इतर फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाल्याने श्रीलंकेला मानहानीकारण पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 4, तर केन रिचर्डसनने 3 फलंदाज बाद केले. पॅट कमिन्सने 2, तर जेसन बेहरेन्फोर्ड एक बळी टिपला.
ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवात
नाणेफेकीचा कौल जिंकणाऱया श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी निमंत्रित करून स्वतःच्या पायावर कुऱहाड मारून घेतली. डेव्हिड वॉर्नर (26) आणि ऍरोन फिंच (153) यांनी 16.4 षटकांत 80 धावांची सलामी देत ऑस्ट्रेलियाला सावध सुरुवात करून दिली. शेवटी धनंजया डिसिल्वाने 17व्या षटकात वॉर्नरच्या यष्टय़ा उडवून श्रीलंकेला पहिले यश मिळवून दिले. धावफलकावर 2 बाद 100 अशी स्थिती असताना ऍरोन फिंच व आलेला स्टीव्हन स्मिथ (73) ही जोडी जमली. या दोघांनी तिसऱया गडय़ासाठी 173 धावांची भागीदारी करताना श्रीलंकन गोलंदाजी निप्रभ ठरविली.
धावफलक :
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. धनंजया 26, ऍरोन फिंच झे. करुणारत्ने गो. उदाणा 153, स्टीव्हन स्मिथ त्रि. गो. मलिंगा 73, ग्लेन मॅक्सवेल नाबाद 46. अवांतर :14, एकूण : 7 बाद 334 धावा. गोलंदाजी : लसिथ मलिंगा 10-1-61-1, नुवान प्रदीप 10-0-88-0, इसुरू उदाणा 10-0-57-2, धनंजया डिसिल्वा 8-0-40-2.
श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने झे. मॅक्सवेल गो. रिचर्डसन 97, कुसल परेरा त्रि. गो. स्टार्क 52, लाहिरु थिरिमाने झे. कॅरी गो. बेहरेन्फोर्ड 16, कुसल मेंडीस झे. कॅरी गो. स्टार्क 30. अवांतर : 8, एकूण : 45.5 षटकांत 247 धावा. गोलंदाजी : मिचेल स्टार्क 10-0-55-4, पॅट कमिन्स 7.5-0-38-2, केन रिचर्डसन 9-1-47-3, जेसन बेहरेन्फोर्ड 9-0-59-1.
































































