
मेलबर्न जळत होते… कोर्ट पेटले होते… सूर्य आग ओकत होता आणि तरीही अव्वल टेनिसपटूंचा खेळ थांबला नाही. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅमवर उष्णतेच्या लाटेने अक्षरशः कहर केला असतानाच एरिना सबालेंका आणि जर्मनीचा स्टार ऍलेक्झॅण्डर झ्वेरेव यांनी आपली ताकद, जिद्द आणि मानसिक कणखरता दाखवत उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश केला. आता उपांत्य फेरीत सबालेंका एलिना स्वितोलिनाशी भिडेल तर झ्वेरेवची गाठ कार्लोस अल्काराझशी पडेल.
40 अंश तापमानातही सबालेंकाचे वादळ
महिलांच्या एकेरीत दोन वेळा विजेती ठरलेली एरिना सबालेंका अक्षरशः वादळासारखी कोर्टवर धावून गेली. तिने 18 वर्षांच्या अमेरिकन इवाना जोविकला 6-3, 6-0 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवत सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली. हा तिच्या कारकीर्दीतील 14 वी ग्रँडस्लॅम उपांत्य फेरीत ठरेल. आता अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी सबालेंकाला युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचे कडवे आव्हान मोडावे लागणार आहे. हा सामना केवळ सामना नसेल, तर शक्ती विरुद्ध संयम, आक्रमकता विरुद्ध शिस्त आणि नंबर-1 विरुद्ध लढवय्या योद्धा असा थरारक महासंग्राम ठरणार आहे.
झ्वेरेवचा अनुभवाचा वार
पुरुषांच्या एकेरीत झ्वेरेवने अनुभवाच्या जोरावर तरुण लर्नर टिएनचे स्वप्न उद्ध्वस्त केले. चार सेट रंगलेल्या लढतीत झ्वेरेवने 6-3, 6-7 (5-7), 6-1, 7-6 (7-3) असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. दुसऱया सेटमध्ये टिएनने टायब्रेक जिंकत सामना बरोबरीत आणला होता, मात्र त्यानंतर झ्वेरेवने गती वाढवत सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले आणि निर्णायक क्षणी अनुभवाचा वरचष्मा सिद्ध केला. दुसरीकडे अल्काराझने ऍलेक्स डी मिनॉरचा 7-5, 6-2, 6-1 असा सहज पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
मेलबर्न पेटलं! ‘एक्स्ट्रीम हीट’मुळे सामने ठप्प
मंगळवारी मेलबर्न अक्षरशः भट्टीत बदलले होते. तापमान 40 अंशांवर पोहोचताच आयोजकांना ‘एक्स्ट्रीम हीट पॉलिसी’ लागू करावी लागली. बाहेरील कोर्टवरील सर्व सामने तत्काळ स्थगित करण्यात आले, मात्र रॉड लेव्हर अरेनासह मुख्य स्टेडियम्सची छत बंद करून इनडोअर परिस्थितीत सामने पूर्ण करण्यात आले. जानेवारीतील ही उष्णता ऑस्ट्रेलियन ओपनसाठी नवी नाही. त्यामुळे यंदा हीट स्ट्रेस इंडेक्स सेन्सर्सद्वारे सतत निरीक्षण केले जात आहे. मर्यादा ओलांडली की खेळ थांबतो. कारण खेळाडूंच्या जिवापेक्षा सामना मोठा नाही, हा आयोजकांचा संदेश पुन्हा एकदा स्पष्ट झाला.


























































