ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम, जोकोविच-मेदवेदेवमध्ये जेतेपदाची झुंज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाचा युवा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव आणि सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच यांच्यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम पुरुष एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. डॅनिल मेदवेदेव याने शुक्रवारी पार पडलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत ग्रीसच्या स्टेफनोस सितसिपास याच्यावर 6-4, 6-2, 7-5 अशा फरकाने सरळ तीन सेटमध्ये दमदार विजय मिळवत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची फायनल गाठली. येत्या रविवारी नोवाक जोकोविच व डॅनिल मेदवेदेव यांच्यामध्ये जेतेपदाची झुंज रंगेल.

महिला एकेरीत कोण होणार चॅम्पियन?

ऑस्ट्रेलियन ओपनमधील महिला एकेरीच्या जेतेपदाचा फैसला उद्या होणार आहे. जपानची नाओमी ओसाका व अमेरिकेची जेनिफर ब्रॅडी यांच्यामध्ये अजिंक्यपदाची लढत होणार आहे. यावेळी नाओमी ओसाका चौथ्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदासाठी टेनिस कोर्टवर उतरेल. जेनिफर ब्रॅडीसाठी उद्याची लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण पहिल्यांदाच ती ग्रॅण्डस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन करण्यासाठी ती प्रयत्न करील यात शंका नाही.

18 व्या जेतेपदाकडे लक्ष्य

नोवाक जोकोविच याच्याकडे ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावण्याचा प्रबळ दावेदार म्हणून बघितले जात आहे. नोवाक जोकोविच यावेळी अठराव्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल. तसेच यावेळी त्याचे लक्ष्य नवव्या ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदाकडेही असेल.