रोहित लढला, पण हिंदुस्थान हरला; ऑस्ट्रेलियाचा 34 धावांनी विजय

21

सामना ऑनलाईन । सिडनी

रोहित शर्मा नावाचे वादळ शनिवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर घोंघावले. मुंबईकर फलंदाजाने 133 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. मात्र त्याच्या खेळीला यशाचे कुंकू लागले नाही. रोहित शर्मा लढला, पण हिंदुस्थान हरला. ऑस्ट्रेलियाच्या 289 धावांचा पाठलाग करणाऱ्या हिंदुस्थानला 254 धावाच करता आल्या. यजमान कांगारूंनी 34 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 26 धावा देत 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवणाऱ्या जे. रिचर्डसन याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

रोहित शर्माने 22 वे वन डे शतक झळकावले. याचसोबत त्याने सौरभ गांगुलीच्या 22 शतकांची बरोबरी केली. श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशान यानेही 22 शतके झळकाविली आहेत. महेंद्रसिंग धोनीने या वन डेत दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला. वन डेत अशी कामगिरी करणारा हिंदुस्थानचा तो पाचवा फलंदाज ठरलाय. याआधी सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी तशी कामगिरी केलीय.ऑस्ट्रेलियाने सिडनीतील विजयासह सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये हजार सामने जिंकण्याचा पराक्रम केला.

धवन, कोहली, रायुडू अपयशी

धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानचे स्टार फलंदाज झटपट बाद झाले. पहिलाच सामना खेळणाऱ्या जेसन बेहरनडॉर्फ याने पहिल्याच षटकात शिखर धवनला शून्यावर पायचीत  केले. त्यानंतर जे. रिचर्डसन याने एकाच षटकात विराट कोहली (3 धावा) व अंबाती रायुडू (0) यांना बाद करीत हिंदुस्थानची अवस्था 3 बाद 4 धावा अशी करून टाकली.

ख्वाजा, मार्श, हॅण्डस्कोम्बची अर्धशतके

ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 59, शॉन मार्शने 54 आणि पीटर हॅण्डस्कोम्बने 73 धावांची खेळी साकारली. मार्कस स्टोयनीसने 43 चेंडूंत प्रत्येकी 2 षटकार व 2 चौकारांसह  नाबाद 47 धावा फटकावल्या.

137 धावांची संयमी भागीदारी पण

हिंदुस्थानचा संघ अडचणीत असताना रोहित शर्मा व महेंद्रसिंग धोनी या जोडीने चौथ्या विकेटसाठी 137 धावांची संयमी भागीदारी रचली. ही जोडी टीम इंडियाला संकटातून बाहेर काढणार असे वाटत असतानाच जेसन बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंग धोनी पायचीत झाला. त्याने 1 षटकार व 3 चौकारांसह 51 धावांची खेळी साकारली. महेंद्रसिंग धोनी ज्या चेंडूवर बाद झाला, तो चेंडू लेगस्टंपबाहेर पडला होता हे रिप्लेमध्ये दिसले. याचा अर्थ तोनॉटआऊटहोता, पण अंबाती रायुडूने स्वतः बाद झाला तेव्हारिह्यूचा वापर केल्यामुळे महेंद्रसिंग धोनीला त्याचा आधार घेता आला नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या