मराठी भाषा आपल्या जगण्याचा भाग बनली तरच जगेल! ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन

‘केवळ कागदांवर किंवा कायदा केल्याने मराठी भाषा जगणार नाही. कोणतेही सरकारी सोपस्कार किंवा कायदा करून भाषेला जगवता येणार नाही. जोपर्यंत मराठी भाषा ही आपल्या जगण्याचा हिस्सा होणार नाही तोपर्यंत ती जगणार नाही. मराठीला जगवण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषिकाची आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.

कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा पंधरवडा’ शुभारंभ कार्यक्रमात आज ते बोलत होते. महापालिका मुख्यालयातील सभागृहात हा सोहळा झाला. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी जोशी, अमित सैनी, अभिजित बांगर, उपायुक्त किशोर गांधी यांच्यासह विविध उपायुक्त, संचालक तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.