बोलीभाषेची समृद्धी – झाडीबोली

<<< वर्णिका काकडे >>>

महाराष्ट्रात वेगवेगळ्या बोली आहेत. या प्रत्येक बोलीचा एक वेगळा गोडवा आहे. यापैकीच एक पूर्व विदर्भातील झाडी बोली. ही भाषा 300 वर्षांपूर्वीची म्हणजे ज्ञानेश्वरांच्या अगोदरपासून आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिह्यांतील काही ग्रामीण भागात ही झाडीबोली मोठया प्रमाणात बोलली जाते. या चार जिह्यांचा भूभाग ‘झाडीमंडळ’ किंवा ‘झाडीपट्टी’ या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ‘झाडीबोली’ या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिह्यांशिवाय या जिह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिह्याचा काही भाग यांचा झाडी भाषिक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. ही झाडी प्रदेशातील बोली म्हणून झाडी बोली या नावाने ओळखली जाते. चक्रधर स्वामी यांनी लिहिलेल्या लीळाचरित्र आणि मुकुंदराजांनी लिहिलेले विवेकसिंधु ग्रंथात बरेच शब्द झाडीबोलीचे आढळतात.

ही वैशिष्ट्यपूर्ण आणि समृद्ध बोली. यात प्रमाण मराठी आणि झाडीबोली यांतील काही शब्द नेमके उलट अर्थाने वापरले जातात, तर काही शब्दांचा उच्चारही वेगळा केला जातो. या बोलीत काही शब्दांच्या बाबतीत असलेले वैविध्य प्रमाण मराठी भाषेमध्येही आढळत नाही. ही प्रमाण मराठीचीच उपबोली असली तरी अनेक बाबतीत ती मराठीहून वेगळी आहे. या बोलीत ‘ण’चा उच्चार ‘न’ असा केला जातो. ‘बाण’, ‘आण’ हे शब्द ‘बान’, ‘आन’ असे उच्चारले जातात. तर ‘ळ’ऐवजी ‘र’ वापरला जातो. म्हणजे ‘काळा कावळा’ हे शब्द झाडीबोलीत ‘कारा कावरा’ असे उच्चारले जातात.

झाडीबोलीत सर्व प्रथम लेखन प्रकाशित करण्याचा मान डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना जातो. महाराष्ट्रातील झाडीबोली चळवळीचे प्रवर्तक ही त्यांची ओळख आहे. त्यांची 106 पुस्तके प्रसिद्ध असून यामधील अर्ध्यापेक्षा जास्त पुस्तके झाडीबोलीत आहेत तर उर्वरित पुस्तके झाडीबोलीसंदर्भातील आहेत. त्यांनी तयार केलेल्या झाडी मराठी शब्दकोशात प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्या शब्दाचा संदर्भ आणि त्याचा कुठे वापर झाल्याची माहिती, भारतातील 24 भाषांत त्याचा कुठे वापर झाला, या सर्वांची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे.