मराठीसाठी प्राधिकरण एका महिन्यात वटहुकूम काढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मराठी भाषेचा प्रसार, प्रचार आणि संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकरण आणि मराठी भाषा भवन स्थापन करण्यात येणार आहे. याच्या अंमलबजावणीसाठी अधिवेशनात निर्णय घेता आला नाही तर एका महिन्यात वटहुकूम काढण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज साहित्यिक आणि मराठी भाषाप्रेमींच्या शिष्टमंडळाला दिले.

मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यभरातील 24 संघटनांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जासह मराठीच्या प्रचार-प्रसारासाठी आणि मराठी भाषा व मराठी शाळांसंबंधीच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, लक्ष्मीकांत देशमुख, कौतिकराव ठाले-पाटील, नागनाथ कोतापल्ले, दादा गोरे, अभिनेत्री वर्षा उसगावकर, डॉ. दीपक पवार यांच्यासह मराठी भाषाप्रेमी, शिक्षक आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी मराठीच्या संवर्धनासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत यासाठी ‘मराठीच्या भल्यासाठी  मराठीचे व्यासपीठ’ अंतर्गत शिष्टमंडळाने सरकारकडे जोरदार मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठी केवळ टिकवण्यासाठी नव्हे तर समृद्ध करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन दिले. मराठीच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून काम करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

शिष्टमंडळाकडून मराठी भाषा प्राधिकरणाचा आराखडाही सरकारकडे यावेळी सादर करण्यात आला. शिवाय राज्यातील सर्वभाषिक शाळांमध्ये मराठी भाषा बारावीपर्यंत अनिवार्य करण्याबाबत ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणीसाठी सकारात्मक प्रतिसादही सरकारने दिल्याचे त्यांनी सांगितले तर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा आंदोलन करू असा इशाराही लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिला. मराठी भाषेवरील अन्याय दूर करण्यासाठी आमदार विलास पोतनीस यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि मुख्यमंत्र्यांशी वारंवार पत्रव्यवहारही केला होता. यावेळी मराठी भाषा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार, आमदार नीलम गोऱ्हे, आमदार विलास पोतनीस, मनीषा कायंदे, मेधा कुलकर्णी, हेमंत टकले, प्रधान सचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

मराठी भाषा संवर्धनासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत. मराठी भाषा संवर्धनाच्या चळवळीत सहभाग वाढावा अशीच अपेक्षा आहे. मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत-विनोद तावडे, मराठी भाषा मंत्री

महाराष्ट्राची मातृभाषा मराठीच्या भल्यासाठी आम्हाला शासनाकडे राजधानीत येऊन गाऱहाणे मांडावे लागते ही तितकीशी स्तुत्य गोष्ट नाही. या सर्व मागण्या शासनाच्या आटोक्यातील आहेत. शासनाने मनात आणलं तर सर्व मागण्या मान्य होतील- मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक

निधी कमी पडू देणार नाही-मुख्यमंत्री
डिजिटल शाळा, नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे मराठी शाळांकडे ओढा वाढत आहे. मराठी नुसती टिकवायची नाही तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक

  • मराठी भाषा शाळांचे सक्षमीकरण करणे
  • सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य
  • मराठी भाषा कायदा व प्राधिकरणाची स्थापना
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे
  • बालभारतीच्या संख्यावाचनातील बदलांबाबत हस्तक्षेप करणे
  • बृहन्मुंबई आणि परदेशातील मराठी भाषेचे हित व संरक्षण