
सियाचीन येथे हिमस्खलन होऊन बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठ जवानांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व गंभीर जखमींना जवळच्या सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 6 जवानांचा मृत्यू झाला.
सोमवारी दुपारच्या सुमारास सियाचीन येथील सर्वात उंच युद्धस्थळ असणाऱ्या भागात हिमस्खलन झाले. यात हिंदुस्थानी लष्कराचे आठ जवान अडकले होते. बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जवानांचा शोध घेण्यासाठी लष्कराचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. सर्व आठ जवानांना हिमस्खलनाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले गेले. परंतु उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत.
संरक्षणमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मृतांच्या कुटुंबियांना सांत्वन देत शोक व्यक्त केला आहे. राजनाथ सिंह यांनी ट्विट करून मृतांना श्रद्धांजली वाहिली. सियाचीनमधील हिमस्खलनामुळे झालेल्या सैनिकांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या धैर्य आणि देशसेवेसाठी मी त्यांना सलाम करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत, असे ट्वीट राजनाथ सिंह यांनी केले.
Deeply pained by the demise of soldiers and porters due to avalanche in Siachen. I salute their courage and service to the nation. My heartfelt condolences to their families.
— Rajnath Singh (@rajnathsingh) November 19, 2019



























































