मराठमोळ्या अविनाश साबळेचे ऑलिम्पिक तिकीट बुक

469

बीड जिह्यातील मराठमोळ्या अविनाश साबळेने ऍथलेटिक्स ट्रकवर इतिहास रचला. दोहा येथे सुरू असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेतील 3000 मीटर स्टीपलचेस ही धावण्याची शर्यत त्याने 8:21:37 अशी वेळ देत पूर्ण केली आणि स्वतःच्या नव्या राष्ट्रीय विक्रमासह टोकियो ऑलिम्पिकचे (2020) तिकीटही बुक केले. या प्रकारात पात्र ठरणारा तो 1952 नंतरचा पहिलाच हिंदुस्थानी खेळाडू ठरलाय. यामुळे तब्बल 67 वर्षांनंतर ऍथलेटिक्सच्या रणांगणात हिंदुस्थानचे नाव उमटले आहे.

अंतिम फेरीत अविनाश साबळे तेराव्या स्थानावर राहिला. 2018 साली जून महिन्यात गुवाहाटी येथे झालेल्या आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत अविनाश साबळेने 8:49:25 अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. यानंतर फेडरेशन कप आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या कामगिरीत सुधारणा करत अविनाश साबळेने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे.

टार्गेट पूर्ण

टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी ऑलिम्पिक पात्र ठरण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले होते, पण टार्गेट पूर्ण करण्यासाठी जिवाचे रान केले. माझ्या प्रशिक्षकांचाही यामध्ये मोलाचा वाटा आहे, असे भावुक उद्गार अविनाश साबळे याने यावेळी काढले.

नव्या जागतिक विक्रमासह रेस जिंकली

अमेरिकेच्या दलीलाह मुहम्मद हिने जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेतील 400 मीटर अडथळा शर्यत नव्या विक्रमासह जिंकली. 29 वर्षीय दलीलाह मुहम्मद हिने 52.16 सेकंद अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत नवा जागतिक विक्रम नोंदवला. सिडनी मॅकलॉफलीनने रौप्य आणि रशेल क्लेटोन हिने कांस्य पदकावर नाव कोरले.

आपली प्रतिक्रिया द्या