
दरोडय़ाच्या गुन्ह्यात फरार असल्याने पोलिसांनी पकडू नये म्हणून वेषांतर करून नालासोपारा येथे बिगारीचे काम करणाऱयाला अखेर क्राईम ब्रँच युनिट-11 ने अटक केली. करीम ऊर्फ बालयार मोहम्मद खान असे त्याचे नाव असून त्याच्या विरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल आहेत.
दोन वर्षांपूर्वी कांदिवली येथे दरोडय़ाच्या तयारीत आलेल्या चौघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली होती. त्या गुह्याचा करीम हा मुख्य सूत्रधार होता. त्या गुह्यात फरार असलेल्या करीमचा पोलीस शोध घेत होते, मात्र तो सापडत नव्हता. दरोडय़ाच्या गुह्यातील एक आरोपी हा त्याच्या भावाला भेटण्यासाठी कांदिवली येथे आल्याची माहिती युनिट-11 चे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील याना मिळाली. प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या पथकातील विशाल पाटील, कांबळे, गायकवाड, सुर्वे, केणी, मोरे यांनी कांदिवली येथे सापळा रचला. भावाला भेटण्यासाठी आलेल्या करीमला पोलिसांनी ताब्यात घेतले.
करीम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी पकडू नये म्हणून तो नालासोपारा येथे वेश बदलून राहायचा. नालासोपारा येथे बिगारीचे काम करत होता, जेणेकरून आपल्याला कोणी पकडणार नाही असे करीमला वाटत होते. त्याला अटक करून कांदिवली पोलिसांच्या ताब्यात दिले. कांदिवली पोलिसांनी करीमला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.



























































