झाडांखाली पडलेली, पक्ष्यांनी खाल्लेली फळे खाणे टाळा; ‘निपाह’च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाबळेश्वर येथील वटवाघळांमध्ये ‘निपाह’ रोगाचे विषाणू आढळल्याचा अहवाल ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी’च्या वतीने देण्यात आला आहे. मात्र, या विषाणूचे माणसाच्या शरीरात संक्रमण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता झाडांखाली पडलेली, पक्ष्यांनी खाल्लेली फळे खाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शेखर सिंह यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव, मेडिकल कॉलेजची प्रक्रिया, निपाह रोगाचे विषाणू, कोरोना चाचणी आदींविषयी माहिती दिली.

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, ‘देशभरात निपाह रोगाचे विषाणू आढळल्याच्या घटना आहेत. या घटनांमुळे भीतीदायक वातावरण निर्माण करू नये. निपाह विषाणूबाबत राज्य शासनाने अद्यापि कोणतेही निर्देश दिले नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात नियंत्रणात आला असून, जिह्याचा पॉझिटिव्हिटी दर 6.69 टक्के आला आहे. तसेच जिह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे आतापर्यंत 143 रुग्ण, तर 26 मृत्यू झाले आहेत. त्याशिवाय कोरोनाचा डेल्टा संक्रमणातील कोणताही रुग्ण सातारा जिह्यात आढळलेला नाही. संभाव्य तिसऱया लाटेशी लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे कटाक्षाने पालन करावे.

शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रक्रियेविषयी माहिती देताना सिंह म्हणाले, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या तपासणी दौऱयासाठी पर्याप्त पयाभूत सुविधा व पदभरतीची तांत्रिक प्रक्रिया राबविली जात आहे. सातारा सिव्हिल हॉस्पिटलची मुख्य इमारत व जम्बो हॉस्पिटलचा विस्तारित भाग मेडिकल कॉलेजसाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. पुणे, मिरज, सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहयोगी प्राध्यापकांना नेमणूक देण्यात येणार असून, साताऱयातील ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या डॉक्टरांकडूनही अर्ज मागविण्यात आले आहेत.

‘वैद्यकीय’चे प्रवेश ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये शक्य

सातारा मेडिकल कॉलेजच्या पायाभूत सुविधांच्या अद्ययावतीकरणासह आस्थापनांवरील पदभरतीच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान कमिशनच्या तपासणी दौऱयानंतर ‘नीट’ परीक्षा वेळेत झाल्यास यंदा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत प्रथम वर्ष वैद्यकीय प्रवेश शक्य असल्याचे स्पष्ट संकेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.