
कोरोनाला रोखण्यासाठी लोकांनी प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहेच, पण लोकजागर, लोकशिक्षण आणि उपाययोजना या त्रिसूत्रीने आपण कोरोनाला पूर्णपणे हरवू शकू असा विश्वास महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केला.
कोरोनाला रोखण्यासाठी खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाऊंडेशन आयोजित ‘इन्फोडोस’ या जनजागृती अभियानाच्या पहिल्या सत्रात डॉ. ओक यांनी ‘कोरोनाची तिसरी लाट’ या विषयावर सर्वसामान्यांशी संवाद साधला. कोरोनाच्या तिसऱया लाटेसह डेल्टा प्लस, लसीकरणाविषयी गैरसमज, लहान मुलांसाठी लसीकरण अशा विविध विषयांवरील लोकांच्या प्रश्नांना डॉ. ओक यांनी उत्तरे देत मार्गदर्शन केले तसेच सर्वांना मास्क वापरण्याचे आणि इतर नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले. त्याआधी या अभियानाचे औपचारिक लोकार्पण डॉ. संजय ओक, खासदार राहुल शेवाळे, श्री राधा फाऊंडेशनच्या अध्यक्षा कामिनी शेवाळे, आमदार सदा सरवणकर, विभागप्रमुख- नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या वतीने करण्यात आले. ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून झालेल्या या चर्चासत्राचे सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी केले. दर रविवारी खासदार शेवाळे यांच्या फेसबुक पेजवरून सकाळी 11 वाजता सर्वसामान्यांना थेट तज्ञांशी संवाद साधता येणार आहे.






























































