
हिंदुस्थानात आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ (India AI Impact Summit) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जगातील आघाडीच्या दोन एआय कंपन्यांच्या प्रमुखांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, भर स्टेजवर या दोन्ही दिग्गजांमधील बेबनाव उघड झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्सनी याला ‘एआय समिटचा फज्जा’ उडाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
नेमके काय घडले?
कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि जगातील प्रमुख टेक कंपन्यांचे सीईओ एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी एकजुटीचे दर्शन घडवण्यासाठी सर्व नेत्यांनी एकमेकांचे हात धरून वर उचलून फोटोसाठी पोझ दिली. मात्र याच वेळी OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमॅन (Sam Altman) आणि Anthropic चे सीईओ डारियो अमोडेई (Dario Amodei) यांनी एकमेकांचा हात धरण्यास स्पष्टपणे नकार दिला. दोघांनीही आपापले हात स्वतंत्रपणे वर उचलले, ज्यामुळे त्यांच्यातील कडवटपणा (Ego Clash) जगासमोर आला आहे.
सॅम ऑल्टमॅन आणि डारियो अमोडेई यांच्यातील हा ‘ऑकवर्ड मोमेंट’ (Awkward Moment) केवळ योगायोग नसून तो त्यांच्यातील व्यावसायिक शत्रुत्वाचा परिणाम आहे. डारियो अमोडेई हे पूर्वी OpenAI मध्येच होते. पण सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून त्यांनी ऑल्टमॅन यांची साथ सोडून स्वतःची ‘Anthropic’ ही वेगळी कंपनी स्थापन केली. एआयच्या शर्यतीत या दोन्ही कंपन्या एकमेकींच्या कट्टर स्पर्धक आहेत. मंचावर मोदींसमोर आलेली ही नाराजी याच व्यावसायिक वर्चस्वाची लढाई असल्याचे बोलले जात आहे.
























































