महिलेला फाशी दिली तर संकटं येतील, अयोध्येच्या महंतांची राष्ट्रपतींना माफी देण्याची विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात स्वातंत्र्यानंतर प्रथमच एका महिलेला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. मात्र, या महिलेला फाशीची शिक्षा देऊ नये अशी विनंती अयोध्येच्या तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी राष्ट्रपतींना केली आहे.

शबनम असं महिलेचं नाव असून तिच्यावर स्वतःच्याच कुटुंबीयांना कुऱ्हाडीने ठार केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. आता तिला फाशी दिली जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही तिच्या दयेचा अर्ज फेटाळला आहे.

अशातच अयोध्या येथील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी राष्ट्रपतींना शबनम हिची फाशी रद्द करण्याची मागणी केली आहे. जर तिला फाशी झाली तर संकटं येतील. हिंदू धर्मातील शास्त्रांनुसार महिलेचं स्थान हे पुरुषांहूनही वर आहे. एका महिलेला मृत्युदंड दिल्याने समाजाचं भलं होणार नाही. तर यामुळे संकटांना निमंत्रण मिळेल. तिचा अपराध कधीच क्षम्य नसला तरी तिला महिला असल्याने माफ केलं गेलं पाहिजे, असं महंत दास यांचं म्हणणं आहे.

ते म्हणाले की, हिंदु धर्मातील एक गुरू असल्याच्या नात्याने मी राष्ट्रपतींना विनंती करतो की शबनम हिची दयायाचिका स्वीकारावी. तिने कारागृहात राहून आपल्या अपराधाचं प्रायश्चित्त घेतलं आहे. जर तिला फाशी झाली तर तो इतिहासातील सर्वात दुर्दैवी क्षण असेल. आपलं संविधान राष्ट्रपतींना काही विशेष अधिकार देतं, त्या अधिकारांचा वापर करून त्यांनी तिला माफ करावं, असं आवाहन दास यांनी केलं आहे.

काय आहे हे प्रकरण

ही 2008 ची घटना आहे. उत्तर प्रदेशमध्ये शबनम आणि सलीम या दोघांचे प्रेमसंबंध होते. शबन एका शाळेत शिक्षिका होती. तर तिचा प्रियकर सलीम हा फक्त आठवी पास होता. दोघांचे अनेक वर्ष प्रेमसंबंध होते. दोघांना एकमेकांशी लग्नही करायचे होते. पण कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला.

दोघेही मुस्लिम धर्मीय होते, पण दोघे वेगवेगळ्या जातीचे होते. शबनम ही सैफी जातीची होती तर सलीम हा पठाण जातीचा होता. म्हणून शबनमच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. ही बाब शबनमला रुचली नाही. म्हणून 14 एप्रिल 2008 रोजी रात्री शबनम आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जाणार होती. तेव्हा शबनमने जेवणातून आपल्या कुटुंबीयांना झोपीची औषध दिले.

नंतर सलीम आणि शबनम दोघे जेव्हा भेटले तेव्हा आपल्या नात्यात येणार्‍या कुटुंबीयांचा काटा काढण्याचे तिने ठरवले. तिने कुर्‍हाडीने आपल्या कुटुंबीयांतील सात जणांना ठार केले. त्यात वडील शौकत, आई हाशमी, भाऊ अनीस, राशी, वहिनी अंजुम आणि आतेबहीण राबिया यांचा समावेश होता.