राममंदिराचे बांधकाम एप्रिलपासून सुरू होणार, 2022 पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता

525

अयोध्येत राममंदिराचे बांधकाम एप्रिल 2020 पासून सुरू होणार आहे. मंदिराचे काम 2022 पर्यंत पूर्ण होईल, असे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. राममंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात येत आहे. राममंदिर न्यासाचे विश्वस्त मंडळ हे गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर बनवले जाणार आहे. राममंदिर विश्वस्त मंडळाची रचना ही सोमनाथ मंदिराच्या विश्वस्त रचनेप्रमाणे असेल. सोमनाथ ट्रस्टचे सहा सदस्य आहेत. अयोध्या ट्रस्टमध्ये 14 ते 17 सदस्य असतील. जुने राम जन्मभूमी न्यास तसेच ठेवून त्यात नवीन सदस्यांचा समावेश करावा, यादृष्टीनेही चर्चा सुरू आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे राममंदिर ट्रस्टचा भाग बनू शकतात. याबाबत अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयातून होईल. सांस्कृतिक खात्याकडे या नव्या ट्रस्टची नोंदणी असेल. त्यामुळे मंदिर उभारणीवर सांस्कृतिक खात्याची देखरेख असेल.

राममंदिराची उभारणी सरकारच्या पैशांतून न होता, लोकवर्गणीतून व्हावी, असे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे. एएनआयच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राममंदिरासाठी सुमारे 100 एकर जागा लागेल. सध्या 67 एकर जागा आहे. त्यामुळे आणखी 33 एकर जागा लागणार आहे. त्यामुळे पाच एकर जागा मशिदीसाठी देणे शक्य नाही. मशिदीला जमीन देण्याच्या प्रक्रियेत केंद्राचा हस्तक्षेप नसेल, राज्य सरकार मशिदीसाठी अन्य ठिकाणी जागा देईल.

अयोध्येत स्मार्ट सिटी उभारणार
हनुमान गढी केंद्रस्थानी ठेवून अयोध्येची पुनर्रचना करण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याचे समजते. केंद्र सरकार अयोध्येत 388 किमी चौरस क्षेत्रफळात स्मार्ट सिटीचा मास्टर प्लॅन तयार करीत आहे. त्यामध्ये रिंग रोड, पार्क ट्रिटमेंट प्लॅन्ट, बस स्टँड, रेल्वे, विमानतळ आणि अन्य सुविधांचा समावेश आहे.

  •  नवीन ट्रस्ट किंवा जुन्या राम जन्मभूमी न्यासामध्ये नवीन सदस्यांना घेऊन ट्रस्ट स्थापन करण्याचा विचार.
  • ट्रस्टच्या सदस्यांची अंतिम निवड पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती.
  •  सांस्कृतिक मंत्रालयाच्या देखरेखीखाली मंदिराचे बांधकाम चालणार.
आपली प्रतिक्रिया द्या