श्रीराम अयोध्येला परतले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रघोष आणि शंखनादात प्राणप्रतिष्ठापना विधी संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्या नगरीत ‘न भुतो न भविष्यति’ असा सोहळा पार पडला. 500 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात दुपारी 12 वाजून 29 मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर रामलल्लांची मूर्ती विराजमान झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रघोषात प्राणप्रतिष्ठापना विधी संपन्न झाल्यावर मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली आणि समस्त विश्वाला श्री रामलल्लांचे मुखदर्शन घडले. अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी असंख्य कारसेवकांनी लढा देत दिलेले बलिदान आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागले. श्रीरामजन्मभूमी लढय़ात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह असंख्य हिंदूंनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले.

प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अयोध्या नगरीत आज पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली. अयोध्येतील भव्यदिव्य आणि ऐतिहासिक राम मंदिरात रामलल्लांची किधिकत पूजा करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘सदा माझे डोळां जडो तुझी मूर्ती। रखुमाईच्या पती सोयरिया।।, गोड तुझें रूप गोड तुझें नाम। देई मज प्रेम सर्व काळ।।’ या तुकोबांच्या अभंगाचे स्मरण रामलल्लांच्या मनमोहक मूर्तीच्या दर्शनाने रामभक्तांना झाले. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणामुळे हिंदुस्थानातीलच नाही, तर जगभरातील तमाम हिंदूंना या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होता आले. यावेळी मंदिर परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. शंखनाद करण्यात आला आणि अवघा देश रामनामाच्या जयघोषात दंग झाला. पंतप्रधान मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी गर्भगृहात उपस्थित होते.

कालचक्र बदलेल, मोदी झाले भावुक

आज गावागावांत कीर्तन, भजन होत आहेत. अवघा देश दिवाळी साजरी करतोय. सायंकाळी घराघरांत रामज्योत तेवेल. काल मी धनुषकोडीत होतो. ज्या वेळी राम समुद्रापार निघाले होते तेव्हा कालचक्र बदलले. आजपासून पुन्हा कालचक्र बदलेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठापना सोहळय़ानंतर उपस्थितांना संबोधित करताना भावुक झाले. रामलल्ला आता तंबूत नाही, तर दिव्य मंदिरात राहणार, असे ते म्हणाले. सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, सर्वांना प्रणाम आणि राम राम… आज आपले राम आले आहेत, अशी भावनिक साद घालत त्यांनी भाषणाला सुरुवात केली.

राम मंदिर उभे राहिल्यानंतर देशभरात नवा उत्साह आणि चैतन्य आले. आज आपल्याला शतकांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर मिळाले आहे. 22 जानेवारी 2024 चा सूर्य एक अद्भुत तेज घेऊन आला आहे. ही कॅलेंडरमध्ये लिहिलेली तारीख नाही, तर नव्या युगाचा आरंभ आहे. पुढची हजारो वर्षे या क्षणाची आठवण काढली जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. मंदिर उभे राहण्यासाठी वेळ लागला त्याबद्दल मोदी यांनी प्रभू श्रीरामाची क्षमाही मागितली. त्याग, तपस्या आणि पूजेत काहीतरी उणीव राहिली होती त्यामुळेच मंदिर निर्माण होऊ शकले नाही. आज ही उणीव भरून निघाली. प्रभू श्रीराम आपल्याला क्षमा करतील असा मला विश्वास आहे. अनेक दशके प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वाची कायदेशीर लढाई लढली गेली. सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

शतकांचा वारसा मिळाला

राम मंदिराच्या उभारणीनंतर देशवासीयांमध्ये नवा उत्साह असून आज आपल्याला शतकानुशतकांचा वारसा मिळाला आहे. श्रीरामाचे मंदिर मिळाले आहे. आपल्या अनेक पिढय़ांनी जे धैर्य दाखवले त्या धैर्याचा वारसा आपल्याला मिळाला आहे. गुलामगिरीची मानसिकता मोडून उठणारे राष्ट्र नवा इतिहास घडवते. आजपासून हजार वर्षांनंतरही लोक या क्षणाबद्दल बोलतील, ही रामाचीच कृपा आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.