
योध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारणीसंबंधी कायदेशीर प्रक्रियेला गती मिळाली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अयोध्येतील 70 एकर क्षेत्राचा नकाशा प्रशासनाकडून मंजूर करून घेण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. या प्रक्रियेसाठी ट्रस्टला दोन कोटींचा खर्च येणार आहे. पुढील 15 ते 20 दिवसांतच नकाशा मंजूर करून घेण्याच्या हेतूने ट्रस्ट सक्रीय झाली आहे. ट्रस्ट आणि मंदिर बांधकाम समितीची दिल्लीत बैठक झाल्यानंतर मंदिर उभारणीच्या औपचारिक बाबींना गती देण्यात आली आहे.
एल अॅड टी कंपनीचे इंजिनिअर मंदिराची जागा तसेच पायासाठी तांत्रिक चाचणीबरोबरच मंदिराच्या नकाशाला अंतिम स्करूप देणार आहेत. याबरोबरच उड्डाण, फायर, पर्यावरणसह इतर काही विभागांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे, असे ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र यांनी सांगितले. ट्रस्टने मंदिरासाठी साधारण 10 हजार तांब्याच्या पटटय़ा पाठवण्याचे आवाहन केले होते. ट्रस्टच्या आवाहनाला देशभरातून अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद लाभला आहे. तांबे दान करण्याच्या मोहिमेचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयातील सचिकांनी श्रीगणेशा केला. त्यांनी रविवारी तांब्याच्या आठ पट्टय़ा अयोध्येत पाठवल्या. तसेच देशाच्या अनेक भागांतील लोकप्रतिनिधी, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकही तांबे दान करण्याची इच्छा व्यक्त करीत फोन करू लागले आहेत.
पायाभरणीसाठी लवकरच मोठ्या मशीन दाखल होणार
मंदिराच्या पायाभरणीसाठी खोदकाम करण्यास एल अॅड टी कंपनीच्या मोठमोठय़ा मशीन लवकरच अयोध्येत दाखल होणार आहेत. काही लोकांनी दान केलेल्या मशीन आधीच अयोध्येत पोहोचल्या आहेत. सध्या मंदिराच्या जागेचे सपाटीकरण पूर्ण करण्यात आले आहे.


























































